बेमुदत काम बंद आंदोलनावर ठाम
By admin | Published: September 12, 2015 11:57 PM2015-09-12T23:57:58+5:302015-09-12T23:57:58+5:30
सर्किट बेंच प्रश्न : कृती समितीच्या आजच्या बैठकीत होणार चर्चा
कोल्हापूर : ‘सर्किट बेंच’प्रश्नी बेमुदत काम बंद आंदोलनावर वकील ठाम आहेत. खंडपीठ कृती समितीच्या आज, रविवारी होणाऱ्या बैठकीत या निर्णयावर चर्चा होणार आहे. त्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे.
गेली ३० वर्षे कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सोलापूर या सहा जिल्ह्यांतील वकील संघटना मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन होण्यासाठी लढत आहेत. वकिलांसह पक्षकार बांधवांनी यापूर्वी मोठी आंदोलने केली आहेत. सलग ५५ दिवस न्यायालयीन कामकाज बंद ठेवले होते. या आंदोलनाची कोंडी फोडण्यासाठी न्यायाधीश शहा यांनी कृती समितीला बैठकीचे निमंत्रण देत सर्किट बेंच स्थापनेची प्रक्रिया ही नियमबद्ध पद्धतीने करावी लागणार आहे. त्यासाठी ‘काम बंद’ आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती करीत ३१ जानेवारी २०१४ पर्यंत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर राज्य शासनाने सर्किट बेंच सहा जिल्ह्याता कोल्हापुरात स्थापन करण्याबाबत ठराव संमत केला असतानाही मंजुरीमध्ये दिरंगाई होत असल्याच्या निषेधार्थ १५ आॅगस्ट रोजी पक्षकारांनी जिल्हा न्यायालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. याची दखल घेत न्या. शहा यांनी २१ आॅगस्ट रोजी खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाशी पणजी (गोवा) येथे चर्चा केली होती. तेव्हा त्यांनी निवृत्तीपूर्वी निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले होते. तसेच ठरावाच्या प्रती व संस्थानकाळातील खंडपीठाची माहिती मागविली होती. कृती समितीने ठरावांसह संस्थानकाळातील माहिती संग्रहित करून फाईल त्यांच्याकडे सादर केली होती; परंतु न्या. शहा यांनी सर्किट बेंचचा निर्णय न घेताच सेवानिवृत्ती घेतल्याने सहा जिल्ह्यांतील वकिलांनी हे आंदोलन सुरू केले आहे.