संवेदनशील पोर्ले तर्फ ठाणेत ‘बिनविरोध’चा डंका
By admin | Published: April 18, 2016 09:40 PM2016-04-18T21:40:04+5:302016-04-19T01:02:32+5:30
गटप्रमुखांनी राखला सलोखा : प्रमुख तीन संस्थांच्या निवडणुकीतील राजकीय हेवेदावे, ईर्ष्येला फाटा
सरदार चौगुले --- पोर्ले तर्फ ठाणे --निवडणूक म्हटलं की, गटनेत्यांची दमछाक, इच्छुकांची आक्रमकता आणि मतदारांची गोची, या समीकरणात निवडणूक प्रक्रिया पार पडते. परंतु, निवडणुकीतील राजकीय हेवेदावे व ईर्ष्येला फाटा देत पन्हाळा तालुक्यातील संवेदनशील असणाऱ्या पोर्ले तर्फ ठाण्यातील मोठा आर्थिक व्यवहार असणाऱ्या तीन सहकारी संस्थांच्या निवडणुका बिनविरोध करून येथील गटप्रमुखांनी राजकीय सलोखा साधला आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवर डोळा ठेवून राजकीय सारिपाटावरील ही एक राजकीय खेळीच आहे.
गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत या गावाने तालुक्यातील राजकारणात आपला दबदबा कायम राखला आहे. तालुक्याच्या राजकारणातील निर्णयात या गावाला मानाचे स्थान आहे. त्यामुळे गावातील राजकीय हालचालींवर मोठ्या नेत्यांचे लक्ष लागून राहिलेले असते.
सर्वच पक्षांची सरमिसळ असणाऱ्या पोर्ले गावात अकरा सहकारी संस्थांचं जाळं आहे. जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पाटील (पोर्लेकर) यांचा कासारी गट, बाजार समितीचे सभापती परशराम खुडे यांचा उदय गट, औषधाला न पुरणारी शिवसेना विधानसभेत गुलाल लावून राजकीय अस्तित्वासाठी झगडत आहे. राष्ट्रवादी युवक संघटनेचे अध्यक्षपद भूषविणारा सर्जेराव सासने राजकीय खेळी करून राजकारणात आपली मोहर उमटवित आहे. एकंदरीत राजकीय ईर्ष्या, अस्तित्व, प्रतिष्ठेसाठी गावात राजकीय वार असताना सक्षम असणाऱ्या तीन संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्याने गावातील मंडळींच्या भुवया उंचावल्या आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीत पडझड झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना कासारी दूध संस्थेच्या
निवडणुकीत पुन्हा पराभवास सामोरे जावे लागले. केवळ राजकीय ईर्ष्येपोटी निवडणूक लढवलेल्या
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्या गटातील ‘हनुमान विकास’ची निवडणूक बिनविरोध करून दिली. याच गमक अनेकांना समजलं नाही. तालुक्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या उदय दूध व उदय पतसंस्थेच्या निवडणुका होणार असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु, गटनेते परशराम खुडे यांच्या संयमी राजकीय खेळीने इच्छुक कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यात त्यांना यश आले. त्यामुळे निवडणुकीसारखी नामुष्की या गटावरील टळली. गावातील उदय गट व कासारी गट जनसुराज्य पक्षाच्या झेंड्याखाली काम करत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकणाऱ्या नेत्यांनी ‘वारणेचा वाघाचा’ शब्द पाळून पक्षांतर्गत राजकीय सलोखा राखला आहे. इतर गट शांत राहून आगामी निवडणुकीत आपले फासे अडकविण्यात मश्गुल आहेत.
सलोख्याच्या राजकारणात संस्थेच्या निवडणुका होवो न होवो; पण या तीन संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. ‘त्या’ संस्थांच्या सभासदांनी निवडणुकीच्या गोचीतून नि:श्वास टाकला आहे, हे मात्र खरे.