कागल तालुक्यात बिनविरोधचे वारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:19 AM2020-12-26T04:19:05+5:302020-12-26T04:19:05+5:30
: गावाच्या विकासासाठी एकत्र येण्याची तयारी अनिल पाटील मुरगूड : राज्यात राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कागल तालुक्यात सध्या ...
:
गावाच्या विकासासाठी एकत्र येण्याची तयारी
अनिल पाटील
मुरगूड : राज्यात राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कागल तालुक्यात सध्या मात्र सामंजस्याचा वेगळाच ट्रेंड बघायला मिळत आहे. १५ जानेवारी रोजी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोधचे वारे वाहू लागले आहे. हळदी, यमगे, कुरुकली, सोनगे, आलाबाद अशा गावात निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहेत. त्यामुळे गावाच्या विकासासाठी गावपातळीवरील नेत्यांनी घेतलेली सामंजस्याची भूमिका नक्कीच कौतुकास्पद आहे.
कोणतीही निवडणूक असली की कागल तालुक्यात राजकीय ज्वर शिगेला पोहोचतो. अगदी गावातील दूध संस्था असो वा विकास संस्था असो, निवडणूक ठरलेली. त्यातून हेवेदावे, जोरदार रस्सीखेच आणि हमखास हाणामाऱ्या ठरलेल्या. विशेषतः मुरगूड आणि कागल पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काही गावांमध्ये पोलिसांना मोठा बंदोबस्त ठेवावा लागतो. इतकेच नव्हे तर काही गावात निवडणुकीचे काम करणे शासकीय अधिकाऱ्यांना जिकिरीचे बनायचे. यातून आता तालुका बाहेर येतोय, असे सकारात्मक चित्र गेल्या काही निवडणुकांमध्ये दिसत आहे.
सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. सर्वसामान्यांशी निगडित असणारी कामे पूर्ण करण्यासाठी सर्वच गटांना ग्रामपंचायतीवर सत्ता हवी असते. यासाठी अन्य कोणत्याही निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत जोरदार ईर्षा दिसत होती. पण सध्या मात्र चित्र वेगळे दिसत आहे. वरच्या राजकारणात नेते एकमेकांना सांभाळून घेत असतील आणि आपल्या सोयीचे राजकारण करत असतील, तर आपली डोकी का फोडून घ्यायची? असा सूर सर्वसामान्य कार्यकर्त्यांतून उमटत आहे. यातूनच ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा विचार बळावत आहे. कागल तालुक्यात हसन मुश्रिफ, संजय मंडलिक आणि संजय घाटगे हे गट एकत्र आहेत. हे तिन्ही नेतेही अनेक वेळा व्यासपीठावर एकत्र येत आहेत. भविष्यात अनेक निवडणुकीत अशीच समीकरणे दिसतील, यात शंका नाही. समरजित घाटगे गट या तिघांचे टार्गेट आहे. बऱ्याच गावात मुश्रिफ, मंडलिक व संजय घाटगे गटाचे कार्यकर्ते एकत्र येत आहेत. त्यामुळे राजे गटाच्या कार्यकर्त्यांचीही मानसिकता बिनविरोधाची दिसत आहे. गावाच्या विकासासाठी सर्व हेवेदावे विसरून एकत्र येण्याची मानसिकता गावपातळीवरील नेत्यांमध्ये दिसत आहे. जास्तीत जास्त ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, तर कागलमधून जिल्ह्यात नव्हे, तर राज्यात एक सकारात्मक संदेश जाईल हे नक्की!
बिनविरोध अभिमानास्पद
गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील सर्वच गावांना गट-तट न पाहता कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. त्यामुळे गावांचा चेहरामोहरा बदललेला आहे. येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत जर गावपातळीवरील नेत्यांनी एकत्रित येत गाव बिनविरोध केले, तर ते अभिमानास्पद असेल. अशा गावांना शासनाकडून जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न करू.
- ना. हसन मुश्रिफ
ग्रामविकासमंत्री
पेरे पाटलांचा व्हिडीओ व्हायरल
पंधरा दिवसांपूर्वी मुरगूडमध्ये आदर्श ग्रामपंचायतीचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे व्याख्यान होते. त्यामध्ये त्यांनी गावाच्या विकासासाठी निवडणुका बिनविरोध करा, असे आवाहन केले होते. त्यांच्या भाषणाचा व्हिडीओही सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.