उंदरवाडी ग्रामपंचायतीची १७ लाख ४५ हजार रुपयांची थकबाकी वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:23 AM2021-04-15T04:23:09+5:302021-04-15T04:23:09+5:30
उंदरवाडी ग्रामपंचायतीची मागील दोन वर्षांची घरफाळा व पाणीपट्टीची थकबाकी २१,९७,५८६ इतकी होती. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी राबविलेल्या लकी ड्रॉ या अभिनव ...
उंदरवाडी ग्रामपंचायतीची मागील दोन वर्षांची घरफाळा व पाणीपट्टीची थकबाकी २१,९७,५८६ इतकी होती. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी राबविलेल्या लकी ड्रॉ या अभिनव उपक्रमास ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे ३१ मार्चअखेर १७ लाख ४५ हजार इतकी रक्कम वसूल झाली आहे. यामध्ये ३१ मार्चअखेर पूर्ण घरफाळा व पाणीपट्टी भरणाऱ्या मिळकतधारकांना भाग्यवान विजेते सोडत (लकी ड्रॉ) योजनेअंतर्गत कुपन देण्यात आले.
या लकी ड्रॉ ची सोडत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्रामपंचायतीच्या सभागृहात ग्रामस्थांच्या उपस्थितीत काढण्यात आली. यामध्ये फ्रिज, तिजोरी, तांब्याचा फिल्टर, घागर, फॅन, खुर्ची अशी २१ बक्षिसे विजेत्यांना देण्यात आली. लकी ड्रॉ सोडतीचे काम उंदरवाडी शिक्षण मंचच्या सदस्यांनी पाहिले.
यावेळी सरपंच भारती संजय पाटील, उपसरपंच संजीवनी दत्तात्रय पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय ढेरे, संजय पाटील, मारुती पाटील, दत्तात्रय पाटील, एम. एच. पाटील, पांडुरंग चौगले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.