संघटन व सुसुत्रीकरणाव्दारे सिंधुदुर्गातील पर्यटनास चालना मिळेल
By admin | Published: April 4, 2017 02:23 PM2017-04-04T14:23:39+5:302017-04-04T14:23:39+5:30
पर्यटन व्यावसायिकांनी संघटित होण्याचे मालवण येथे रावल यांचे आवाहन
लोकमत आॅनलाईन
सिंधुदुर्गनगरी, दि. ३ : पर्यटकांची आथित्यशील जपणूक, विनम्र सेवा यामुळे पर्यटक सुखावतात. माऊथ पब्लीसिटीद्वारे ते आणखीन पर्यटकांना आकर्षित करु शकतात. या दृष्टीकोनातून निवास - न्याहरी चालकांची, पर्यटकांची प्रवासी वाहतुकदारांची, स्कुबा डायव्हींगची सुविधा चालकांची अशा पर्यटनाशी निगडीत संघटना उभारुन सुसुत्रीकरणाद्वारे नियोजन केल्यास पर्यटनास अधिक चालना मिळू शकेल. यासाठी सिंधुदुर्गातील पर्यटन व्यावसायिकांनी संघटन करावे, असे आवाहन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी मालवण येथे केले.
मालवण येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित निवास - न्याहरी योजनेत समाविष्ट असलेल्या चालकांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, प्रमोद जठार, संदेश पारकर, राजन तेली, मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक गोविंदराज आदी मान्यवर उपस्थित होते.
जगातल्या अनेक देशात आज पर्यटन मुख्य व्यवसाय किंवा उद्योग म्हणून सुरु असल्याचे सांगून पर्यटन मंत्री रावल म्हणाले की, पर्यटन ही संस्कृती आहे. स्थानिकांनी या संस्कृतीची जोपासना करुन आर्थिक उन्नती साधली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्वदेश दर्शन योजनेखाली राज्यातल्या सर्वांगसुंदर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड झाली आहे. ८२ कोटी रुपयांची पर्यटन विकास कामे होणार आहेत. याचबरोबर सी वर्ल्ड प्राजेक्टही ग्रामस्थांच्या सहकार्याने सुरु होईल असे सांगून ते म्हणाले, या प्रकल्पामुळे तोंडवली- वायंगणी परिसरातील स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या संधीचा लाभ घेण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
शतकोत्तरी मालवण नगरपालिकेस सहकार्य
सभेपूर्वी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी मालवण नगरपालिकेस सदिच्छा भेट दिली. नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी स्वागत केले. यावेळी रावल यांनी शतक महोत्सवी मालवण नगरपालिकेस सर्वतोपरी सहकार्य केल जाईल. मालवण नगरपालिकेच्या पर्यटन विकास कार्यात पर्यटन महामंडळाचे निश्चीत भरीव योगदान राहील अशी ग्वाही दिली.
निवास- न्याहरी चालकांच्या अडचणींचे निराकरण करु
मालवण विश्रामगृहावर झालेल्या सभेत मार्गदर्शन करताना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी निवास- न्याहरी चालकांच्या सर्व अडचणींचे निराकरण केले जाईल असे स्पष्ट करुन ते म्हणाले, कमी व्याजदराने अर्थसहाय्य, तारकर्ली- देवबाग कडे जाणा-या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी सर्वांनी संमत्ती दिल्यास लाभधारकांचे कंपौडचे काम शासनामार्फत करुन देण्यात येईल. कोकण ग्रामीण पर्यटन योजनेतून स्कूबा ड्रायव्हींग प्रशिक्षणासाठी आवश्यक ५0 हजार रुपयांची फी देण्याचा प्रयत्न करु. कृषि पर्यटन वाढावे यासाठी इच्छूक लाभार्थींना कृषी विद्यापिठाच्या वेंगुर्ला केंद्रात सहा महिन्याचे प्रशिक्षण देण्यात येईल.
सी. आर. झेड. कायद्याचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक गोविंदराज यांनी स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत जिल्ह्यात होणा-या पर्यटन विकासकामांची माहिती दिली. बाबा मोंडकर यांनी निवास- न्याहरी चालकांच्या अडचणी यावेळी सविस्तरपणे विशद केल्या. स्कूबा ड्रायव्हींग प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी पर्यटनमंत्री रावल तसेच उपस्थित मान्यवरांचे हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
हर्षदा मांजरेकर, तोडणकर, कन्हैया तांडेल, भूषण जुवाटकर, जितेंद्र शिरसेकर यांचा यावेळी गौरव करण्यात आला. यावेळी मालवण, तारकर्ली, देवबाग परिसरातील निवास न्याहरी चालक उपस्थित होते.