पदाधिकाऱ्यांची वाहने प्रशासनाच्या ताब्यात
By admin | Published: September 13, 2014 12:45 AM2014-09-13T00:45:12+5:302014-09-13T00:47:40+5:30
जिल्हा परिषदेमध्ये आचारसंहितेची लगबग : प्रशासनासह सर्वांचीच तारांबळ
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आज, शुक्रवारी जाहीर होणार असल्याने सकाळपासूनच जिल्हा परिषदेमध्ये अधिकारी व पदाधिकाऱ्यांची एकच धांदल उडाली होती. सायंकाळी बहुतांश पदाधिकाऱ्यांनी आपल्या गाड्या प्रशासनाच्या ताब्यात दिल्या.
आज, उद्या, परवा आचारसंहिता लागणार असे गेले पंधरा दिवस शासकीय अधिकाऱ्यांसह राजकीय नेतेमंडळींचे डोळे घोषणेकडे लागले होते. अखेर आज सायंकाळी निवडणूक आयुक्तांनी आचारसंहितेची घोषणा केल्याने प्रशासनासह सर्वांचीच तारांबळ उडाली. आज, सायंकाळी आचारसंहितेची घोषणा होईल, असे आखाडे बांधले जात होते. त्यामुळे सकाळपासूनच जिल्हा परिषदेमध्ये फायलींनी गती घेतली होती. या विभागातून दुसऱ्या विभागात फाईल नेण्यासाठी शिपाई यांच्या ऐवजी ज्यांचे काम आहे तीच मंडळी धावाधाव करताना दिसत होती. सायंकाळी उशिरापर्यंत काही विभागांचे कामकाज सुरू होते. अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समितीचे सभापती यांच्या गाड्या सायंकाळी प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आल्या. गोकुळ अध्यक्षांसह संचालकांच्या गाड्या जमा करण्याबाबत प्रशासनाचे पत्र आलेले नाही. (प्रतिनिधी)