रेशन आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे; कोल्हापुरात शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

By संदीप आडनाईक | Published: September 20, 2022 04:01 PM2022-09-20T16:01:52+5:302022-09-20T16:02:19+5:30

''दिल्लीत बसलेल्या पांढऱ्या दाढीवाल्या माेदीला अन् राज्यात सत्तेत बसलेल्या काळ्या दाढीवाल्याला सत्तेतून बाहेर खेचा खेचा''

Under the leadership of Shiv Sena, women with ration cards marched to the Kolhapur Collectorate | रेशन आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे; कोल्हापुरात शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

छाया : नसीर अत्तार

googlenewsNext

कोल्हापूर : रेशन आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, शिवसेना झिंदाबाद, रेशनवर गहू तांदूळ मिळालेच पाहिजे, नरेंद्र मोदी मुर्दाबाद, एकनाथ शिंदे मुर्दाबाद अशा घोषणा देत आज, मंगळवारी शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर रेशनकार्डधारक महिलांनी भव्य मोर्चा काढला. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

केंद्र आणि राज्य सरकारमार्फत केशरी कार्डावरील ग्राहकांनाही स्वेच्छेने अन्नधान्य अनुदानातून बाहेर पडण्याची सक्ती केली जात आहे. याविरोधात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात रेशन कार्ड धारक महिलांना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. दुपारी बारा वाजता दसरा चौकातून व्हीनस कॉर्नर, बसंत बहार रोड, असेंम्बली रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत निघालेल्या या मोर्चात सामान्य कुटूंबातील रेशनकार्डधारक महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना विजय देवणे यांनी मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी जिल्हा प्रमुख संजय पवार, शहर प्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, हर्षल सुर्वे यांच्यासह नगरसेविका प्रज्ञा उत्तुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील, तानाजी आंग्रे, विराज पाटील, अभिषेक देवणे आदी उपस्थित होते.

रेशनचा अधिकार कायम करा, रेशनसाठी उत्पन्नाची किमान मर्यादा वार्षिक दोन लाख रुपये करा, उत्पन्नावर आधारित रेशनकार्ड बंद करु नका, केशरी रेशन कार्डवर गहू-तांदूळ-डाळ द्या, अन्न-धान्यावरील जीएसटी कर रद्द करा, गॅस सिलिंडरची किंमत ५०० रुपये करा, दसरा दिवाळीकरीता रेशनवर खाद्यतेल, डाळ आणि साखर द्या, बायोमेट्रीक पध्दत रद्द करा, जिल्हातीलअन्नसुरक्षा योजनेचा इष्टांक वाढवा, रेशनवरील प्रशासनाचा भ्रष्टाचार थांबवा, कर्जासाठी इन्कमटॅक्स नंबर काढलेला असेल, तर अशा केवळ तांत्रिक कारणासाठी रेशन बंद करु नका, दुचाकी, तीनचाकी, रिक्षा, टेम्पो असणाऱ्यांचे रेशन चालू ठेवा, शासन योजनेतून घरकुल अथवा इतर योजनेतून स्लॅबचे घर बांधले असेल तर रेशन चालू ठेवा, अशा विविध मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देण्यात आले.

शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख विजय देवणे यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकारवर टीका केली. सरकारकडून सामान्य कुटूंबाला किमान ३५ किलो धान्य मिळाले पाहिजे, यामध्ये २० किलो तांदूळ आणि १५ किलो गहू दिले पाहिजे, दिवाळीत रेशनवर गहू, डाळ आणि तेल दिले पाहिजे, तसेच डिझेल, पेट्रोल राहू द्या पण गॅस सिलेंडरची किंमत कायमस्वरुपी ५०० रुपये करा अशी मागणी केली. १९६७ मध्ये माझ्या आईचा पदर धरुन मी अशाचप्रकारच्या मोर्चाला सामोरा गेलो होतो, त्यावेळी लोकांनी दुकाने लुटली होती. आताच्या सरकारनेही असाच निर्णय कायम ठेवला तर लोकं दुकानं लुटण्यास कमी करणार नाहीत, असा इशारा देवणे यांनी दिला.

पांढऱ्या दाढीवाल्या मोदीला सत्तेतून खेचा

दिल्लीत बसलेल्या पांढऱ्या दाढीवाल्या माेदीला अन् राज्यात सत्तेत बसलेल्या काळ्या दाढीवाल्याला सत्तेतून बाहेर खेचा खेचा, अशा शब्दात नेत्यांनी आपल्या भाषणात सत्ताधारी सरकारविरोधातील आपला रोष या मोर्चात प्रकट केला.

Web Title: Under the leadership of Shiv Sena, women with ration cards marched to the Kolhapur Collectorate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.