गडहिंग्लज पंचायत समितीला मिळाली तब्बल१६ लाखांची बक्षिसे!, 'यशवंत पंचायतराज'मध्ये हॅट्रिक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 11:48 AM2024-03-02T11:48:29+5:302024-03-02T11:48:37+5:30
राम मगदूम गडहिंग्लज(जि. कोल्हापूर ) यशवंत पंचायतराज अभियान अंतर्गत २०२०-२१ व २०२२-२३ या दोन्ही वर्षी झालेल्या स्पर्धेत गडहिंग्लज पंचायत ...
राम मगदूम
गडहिंग्लज(जि.कोल्हापूर) यशवंत पंचायतराज अभियान अंतर्गत २०२०-२१ व २०२२-२३ या दोन्ही वर्षी झालेल्या स्पर्धेत गडहिंग्लज पंचायत समितीने पुणे विभागात द्वितीय क्रमांक पटकावला. दोन्ही वर्षात मिळून तब्बल १६ लाखांची बक्षिसे मिळाली.सलग दोन्ही स्पर्धेत यश मिळवणारी गडहिंग्लज ही जिल्ह्यातील एकमेव पंचायत समिती असून या स्पर्धेतील यशाचे ही हॅट्रिक आहे.
शुक्रवारी (१ मार्च) पुणे येथे पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते गडहिंग्लज पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी शरद मगर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.यावेळी उपायुक्त विजय मुळीक, राहुल साकोरे,पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याश्मी नागराजन यांची प्रमुख उपस्थिती होती.
पंचायत समितीच्या सर्व विभागांचे उत्कृष्ट कामकाज,केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, शून्य प्रलंबितता
लोकाभिमुख प्रशासन व जनतेला दिली जाणारी सेवा, अधिकारी व कर्मचाऱ्यांची बांधिलकी, तंत्रज्ञानाचा वापर,अभिलेख वर्गीकरण, लेखा परीक्षण आदीतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा पुरस्कार मिळाला.
गडहिंग्लज पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (पंचायत)राजन दड्डीकर , पाणी पुरवठा कनिष्ठ अभियंता मयंक कुरुंदवाडकर, विस्तार अधिकारी(आरोग्य)अमर निंबाळकर, भडगावचे ग्रामसेवक राजेंद्र गवळी, हरळीचे ग्रामसेवक संदीप आदमापूरे आदी उपस्थित होते.
वर्षात ४९ लाखांची बक्षिसे!
२०२०-२१ मध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत समिती सशक्तीकरण अभियानाअंतर्गत राज्यातील अव्वल पंचायत समितीचा २५ लाखांचा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मिळाला.त्यानंतर यशवंत पंचायतराज अभियानाअंतर्गत सलग तिसऱ्यांदा पुणे विभागात दुसरा क्रमांकाचे प्रत्येकी ८ लाखांचे मिळून २४ लाखांची बक्षिसे मिळाली.गटविकास अधिकारी शरद मगर यांच्या कारकीर्दीत हे यश मिळाले आहे.
वर्षात मिळून तब्बल ४९ लाखांची बक्षिसे मिळवणारी गडहिंग्लज पंचायत समिती ही जिल्ह्यातील एकमेव पंचायत समिती आहे.