पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा १५ एप्रिलपासून पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:25 AM2021-04-09T04:25:56+5:302021-04-09T04:25:56+5:30
कोल्हापूर : कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखेतील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा दि.१५ एप्रिलपासून पूर्ववत सुरू होणार आहेत. ...
कोल्हापूर : कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखेतील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा दि.१५ एप्रिलपासून पूर्ववत सुरू होणार आहेत. या परीक्षा ऑनलाइन स्वरूपात घेण्याचा निर्णय विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने घेतला आहे. दि.६ ते १२ एप्रिलपर्यंत स्थगित केलेल्या परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाकडून लवकरच जाहीर केले जाणार आहे.
राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने ‘ब्रेक दी चेन’अंतर्गत निर्बंधांबाबतची नवी नियमावली दि.५ एप्रिल रोजी लागू केली. त्यामध्ये विद्यापीठाच्या परीक्षा घेण्याबाबत स्पष्टता नसल्याने विद्यापीठाने दि.६ ते १२ एप्रिल या कालावधीतील परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर परीक्षा मंडळाने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर डॉ. मेघा गुळवणी समितीसमवेत चर्चा केली. त्यातील निर्णयानुसार या पुढील सर्व परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येतील, असे जाहीर केले. त्यानंतर पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा दि.१५ एप्रिलपासून पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार सुरू करण्याचा निर्णय गुरुवारी जाहीर केला. त्या दिवसापासून बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी. या अभ्यासक्रमांच्या प्रथम, द्वितीय वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन स्वरूपातील होतील. दि.६ एप्रिलपासून स्थगित केलेल्या परीक्षा या संबंधित अभ्यासक्रमांच्या परीक्षा झाल्यानंतर पुढील सहा दिवसांमध्ये घेण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती परीक्षा मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी दिली. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी ऑफलाइन परीक्षेचा पर्याय निवडला होता. ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा दि. ६ एप्रिलपासून ऑफलाइन सुरू होणार होत्या, अशा सर्व विद्यार्थ्यांनी शनिवार (दि.१०) पूर्वी ऑनलाइन परीक्षेचा पर्याय निवडावा, असे आवाहनही त्यांनी केले.
चौकट
प्रथम वर्ष, कल्स्टर परीक्षा ऑनलाइन
पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार प्रथम वर्ष आणि कल्स्टर परीक्षा कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील महाविद्यालयांनी जास्तीत जास्त प्रमाणात ऑनलाइन स्वरूपात घेण्यात याव्यात, अशी सूचना परीक्षा मंडळाने महाविद्यालयांना केली आहे.