जयसिंगपूरसाठी भुयारी गटर योजना
By Admin | Published: March 3, 2015 08:03 PM2015-03-03T20:03:54+5:302015-03-03T21:31:52+5:30
६० ते ७० कोटी खर्च अपेक्षित : सांडपाण्याचा प्रश्न निकाली निघणार; सांडपाणी प्रक्रिया केंद्रही उभारणार
संदीप बावचे - जयसिंगपूर -कोणतीही करवाढ न करता नगरपालिकेने शहरात विकासकामे राबविण्याचा निर्णय घेऊन आणखी एक विकासात्मक पाऊल टाकले आहे. शहरात भुयारी गटर योजना राबविण्यात येणार असून, ६० ते ७० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ही योजना राबवीत असताना सांडपाणी प्रक्रिया केंद्रही उभारले जाणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची असणाऱ्या या योजनेचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे.नळपाणी योजनेबरोबरच शहराला भुयारी गटर योजना राबविण्याच्या दृष्टिकोनातून जयसिंगपूर पालिकेने पाऊल टाकले आहे. शहरात आंबेडकर सोसायटी, शाहूनगर, संभाजीनगर या तीन मुख्य ठिकाणी नाले असून, त्याचे सांडपाणी शहरातील स्टेशन रोडवर एकत्रित होते. २० वर्षांत वाढीव वसाहतीमुळे शहराच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे. परिणामी शहराला भुयारी गटर योजनेची गरज भासू लागली. आरोग्याच्या दृष्टीने भुयारी गटर योजना महत्त्वाची असल्याने नगरपालिकेने सुमारे ६० ते ७० कोटी रुपये अपेक्षित खर्च असणारी ही योजना राबविण्याचा निर्णय घेऊन नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय विशेष सभेत योजनेसाठी तीस कोटींची तरतूद केली आहे. सुमारे शंभर किलोमीटर अंतराच्या नलिका टाकण्याचे नियोजन आहे. योजना राबविण्याच्या दृष्टिकोनातून सर्वेक्षण करण्याचे काम सुरू असून त्यानंतरच शहरात किती सांडपाणी साचते, हे सांडपाणी निचरा करण्यासाठी किती खर्च, योजनेसाठी किती कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असेल हे समजणार आहे. योजना राबवीत असताना सांडपाणी प्रक्रिया केंद्रही उभारण्याचे नियोजन आहे. जेणेकरून या पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी शेतीसाठी व बागेसाठी तसेच पाणी संस्थांना देऊन पालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सध्या भुयारी गटर योजना आराखडा तयार करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वेक्षण सुरू आहे. असे असले तरी भुयारी गटर योजनेची पाईपलाईन अडचणीची ठरू नये, याचे देखील नियोजन करणे महत्त्वाचे आहे.
भुयारी गटर योजनेसाठी आराखडा मंजूर करून तो शासनाकडे पाठविला जाणार आहे. १५ टक्के नगरपालिका, ४५ टक्के शासनाचा निधी अशी ही योजना आहे. योजना मंजुरीनंतर शासनाकडून ३० कोटी रुपयांचा निधी अपेक्षित धरून अर्थसंकल्पात तशी तरतूद केली आहे. सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात आल्यानंतर निश्चितच पालिकेच्या उत्पन्नातही भर पडणार आहे.
- हेमंत निकम, मुख्याधिकारी
घरगुती सांडपाण्याचा प्रश्न निकालात
शहरामध्ये १०० टक्के भुयारी गटर योजना राबविण्यात येणार असल्यामुळे घरगुती सांडपाण्याचा प्रश्न निकालात निघणार आहे. आराखडा तयार करण्यासाठी चार महिन्यांची मुदत आहे. सर्वेक्षणानंतरच अपेक्षित खर्च व येणाऱ्या अडचणी समजणार आहेत. पर्यायाने या योजनेमुळे सांडपाण्याचा प्रश्न निकालात निघेल, अशी अपेक्षा पालिकेकडून व्यक्त केली जात आहे.