चीनसाठी भारताला समजून घ्या
By admin | Published: July 22, 2016 12:43 AM2016-07-22T00:43:21+5:302016-07-22T00:51:10+5:30
जबीन जेकब यांचे प्रतिपादन : विद्यापीठात ‘भारत-चीन संबंध’ कार्यशाळेला प्रारंभ
कोल्हापूर : चीनच्या अभ्यासासाठी अन्य वैचारिक सामग्री आवश्यक आहे, केवळ कटुता असणे महत्त्वाचे नाही. चीन समजून घेण्यासाठी भारताला आपण अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतले पाहिजे, असे प्रतिपादन दिल्लीतील ‘इन्स्टिट्यूट आॅफ चायनीज स्टडीज’चे सहायक संचालक डॉ. जबीन जेकब यांनी गुरुवारी येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागामार्फत आयोजित ‘भारत-चीन संबंध’ या राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठातील मानव्यशास्त्र सभागृहातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
डॉ. जेकब म्हणाले, भारत-चीन संबंधाचे भविष्य हे फक्त दिल्ली किंवा बीजिंगकेंद्र्रित नव्हे, तर ते राज्य, प्रदेश आणि शहरकेंद्री असले पाहिजे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला चीनशी आर्थिक, औद्योगिक, व्यावसायिक संबंध वृद्धिंगत करण्याची मोठी संधी आहे. मुंबई हे आशियाचे एक मोठे व्यावसायिक केंद्र आहे. त्यामुळे चीनमध्ये मुंबईविषयी मोठे आकर्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीनला भेट देणाऱ्या शिष्टमंडळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश होणे, ही त्यामुळे स्वाभाविक बाब होती. या पार्श्वभूमीवर, चीन एकीकडे भारताचा प्रतिस्पर्र्धी मानला जात असला तरी, त्याच्या क्षमतांचा अभ्यास करून त्यांच्याशी या अनुषंगाने सहकार्यवृद्धी करणे गरजेचे आहे.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, चिनी भाषा शिकणे भारतीय अर्थकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. चीनसमवेत शैक्षणिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी शिवाजी विद्यापीठ प्रयत्नशील राहील. कार्यशाळेच्या प्रारंभी मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र व नागरिकशास्त्र विभागाचे डॉ. सुरेंद्र जोंधळे यांनी कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी राज्यशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. प्रकाश पवार, भारती पाटील, भगवान माने, आदी उपस्थित होते. डॉ. वासंती रासम यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रवींद्र भणगे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
देशिंगकरांचा वारसा पुनरुज्जीवित व्हावा
कोल्हापूरच्या कृषी व कृषिआधारित प्रक्रिया उद्योगांच्या वृद्धीसाठी चिनी तंत्रज्ञानाच्या सहकार्याने अभ्यास केला पाहिजे, असे डॉ. जेकब म्हणाले, कोल्हापूरमधील कुरुंदवाड येथील गिरी देशिंगकर यांनी चीनविषयक अभ्यासक म्हणून भारत व चीन या देशांदरम्यान सहकार्य वृद्धीसाठी १९८०-९० च्या दशकात मोठे प्रयत्न केले आहेत. चीनशी संबंधांचा कोल्हापूरचा हा वारसा देशिंगकर यांनी आधीच निर्माण करून ठेवला आहे. तो कोल्हापूरकरांनी पुनरुज्जीवित करण्याची गरज आहे.