वृद्धांचा सांभाळ आद्यकर्तव्य समजून करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:23 AM2021-02-12T04:23:20+5:302021-02-12T04:23:20+5:30
कोल्हापूर : आजच्या काळात वृद्धाश्रम ही काळाची गरज बनली आहे. हे दुर्दैव असले तरी सत्य आहे. आई-वडील ...
कोल्हापूर : आजच्या काळात वृद्धाश्रम ही काळाची गरज बनली आहे. हे दुर्दैव असले तरी सत्य आहे. आई-वडील आपल्या इच्छांचा त्याग करून आपल्या मुलांना लहानाचे मोठे करतात. मात्र, वृद्ध झाल्यानंतर ते अडगळ बनतात. प्रत्येकाने आपणही वृद्ध होणार आहोत, हे समजून आई-वडिलांचा सांभाळ केला तरच वृद्धाश्रमांची संख्या कमी होईल, असे प्रतिपादन डाॅ. अपर्णा देशमुख यांनी गुरुवारी केले. आंतरभारती शिक्षण मंडळ व पाटगावकर कुटुंबियांतर्फे दिला जाणारा सातवा ‘कुसुम पुरस्कार’ ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांच्या हस्ते डाॅ. देशमुख यांना प्रदान करण्यात आला. रोख एकावन्न हजार रुपये, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. अध्यक्षस्थानी आंतरभारती शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सुचेताताई कोरगावकर होत्या.
डाॅ. देशमुख म्हणाल्या, ज्याला मी मदत करू शकते, ते ठिकाण कोणतेही असो; ती मी करते. ज्यांच्या मागे कोणीच नाही, अशा वृद्धांची शुश्रूषा होत नाही. त्यामुळे समाज त्यांच्याकडे ओझे म्हणून पाहतो. ते ओझे न होता, त्यांची आद्यकर्तव्य समजून सेवा करा. प्रारंभी आम्ही अशाच रस्त्यावर सोडलेल्या वृद्धेला आणले, तिची शुश्रूषा केली. त्यानंतर अशा चारशे वृद्ध स्त्री-पुरुषांना माझ्या ‘आभाळमाया’ वृद्धाश्रमाकडे आणले. त्यापैकी सध्या आमच्याकडे ७७ वृद्ध आहेत. त्यांचे आणि माझे नाते बनले. त्यामुळे मी त्यांना सोडले नाही. वृद्धांकडे ओझे म्हणून पाहू नका. तेही समाजाचे मानवी घटक आहेत. त्यांना आदर द्या, त्यांना समजून घ्या. विद्यार्थी असे घडवा की राज्यात वृद्धाश्रमांची गरज भासणार नाही, असे आवाहनही त्यांनी उपस्थित शिक्षकांना केले.
‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले म्हणाले, आजच्या काळात नाती तकलादू बनली आहेत. त्यामुळे सत्तावीस वर्षांच्या मुलीला ‘आभाळमाया’सारखी संस्था उभी करावी लागते. संस्कार हरवून गेले आहेत. दोन पिढ्यांतील द्वंद्व आजही सुरू आहे. अशा काळात डाॅ. अपर्णा यांच्यासारख्या मुलींना बळ देणे ही काळाची गरज आहे.
संस्थेच्या अध्यक्षा सुचेताताई कोरगावकर यांनी डाॅ. देशमुख यांच्या कार्यासाठी दहा हजारांचा धनादेश कोरगावकर कुटुंबियांतर्फे दिला. संस्थेचे सचिव एम. एस. पाटोळे यांनी आभार मानले. यावेळी तनुजा शिपूरकर, पल्लवी कोरगावकर, जिनरत्न रोटे, संजीव पाटगावकर उपस्थित होते.
चौकट
सिंहगड रोड, पुणे येथील ‘आभाळमाया’ या वृद्धाश्रमाची डाॅ. अपर्णा यांनी वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी स्थापना केली. आतापर्यंत त्यांच्या या उपक्रमातून ४०० वृद्धांना त्यांनी आधार दिला होता. सद्यस्थितीत त्यांच्याकडे ७७ वृद्ध आहेत. याशिवाय ज्यांच्याकडे काहीच नाही, अशा चार हजार लोकांवर त्यांनी मोफत शस्त्रक्रियाही केल्या आहेत.
फोटो : ११०२२०२१-कोल-कुसुम पुरस्कार
ओळी : कोल्हापुरातील आंतरभारती शिक्षण मंडळ व पाटगावकर कुटुंबियांतर्फे गुरुवारी कोरगावकर हायस्कूलमध्ये सातवा ‘कुसुम पुरस्कार’ पुण्याच्या डाॅ. अपर्णा देशमुख यांना ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी डावीकडून संजीव पाटगावकर, तनुजा शिपूरकर, पल्लवी कोरगावकर, सुचेता कोरगावकर, जिनरत्न रोटे, एम. एस. पाटोळे, सुचिता पडळकर उपस्थित होत्या.