‘अप्रगत विद्यार्थी शोध’चे पेपर फुटले
By admin | Published: September 19, 2015 12:00 AM2015-09-19T00:00:48+5:302015-09-19T00:03:25+5:30
सोईने घेतल्या परीक्षा : शाळांना सुट्या प्रश्नपत्रिकांचे वाटप; गोपनीयतेचा भंग
भीमगोंडा देसाई -- कोल्हापूर इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या अप्रगत विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी राज्यस्तरावर तयार केलेली प्रश्नपत्रिका जिल्ह्यात फुटली आहे. सर्व शाळांमध्ये सुट्या प्रश्नपत्रिका एकाचवेळी पोहोच केल्या आहेत. मात्र, एकाच दिवशी ही परीक्षा घेणे बंधनकारक नसल्यामुळे सोईने परीक्षा घेतली जात आहे. यामध्ये गोपनीयतेचा भंग झाल्यामुळे अप्रगत विद्यार्थ्यांची वस्तुस्थितिदर्शक माहिती मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. परिणामी, ही चाचणी परीक्षा केवळ फार्स ठरणार आहे.शासनाच्या शालेय व क्रीडा विभागातर्फे प्रगत शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत यंदापासून अप्रगत विद्यार्थी शोधले जात आहेत. यासाठी शासकीय, खासगी शाळांतील दुसरी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात येणार आहे. मिळालेल्या अप्रगत विद्यार्थ्यांना दोन वर्षांत प्रगत करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यासंबंधी जिल्हास्तरावर शिक्षण विभागाला प्रशिक्षण दिले आहे. गणित आणि भाषा विषयांची चाचणी १४ ते ३० सप्टेंबरअखेर घेण्याचे नियोजन केले आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने प्रश्नपत्रिका तयार करून त्या जिल्हा शिक्षण प्रशासनातर्फे शाळास्तरावर वितरित केल्या आहेत. भाषा विषयाच्या प्रश्नपत्रिका चार दिवसांपूर्वीच शाळा स्तरावर पोहोच केल्या आहेत. गणित विषयाच्या प्रश्नपत्रिका वाटण्याची प्रक्रिया सुरू आहे. शाळानिहाय प्रश्नपत्रिका देताना त्या पॅकिंग न करता सुट्या स्वरूपात मुख्याध्यापकांकडे सुपूर्द केल्या आहेत. गोपनीयताच नसल्यामुळे प्रश्नपत्रिका फुटल्या आहेत. रीतसर चाचणी घेण्याआधीच बहुतांश शाळांत प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या जात आहेत. सरावही करून घेतला जात आहे. एकाच दिवशी परीक्षा नसल्यामुळे प्रश्नपत्रिकांची सहजपणे देवाणघेवाण सुरू आहे.
प्रश्नपत्रिका शिक्षक, विद्यार्थी यांना सहज उपलब्ध होत आहेत. त्यामुळे ही चाचणी परीक्षा केवळ फार्स ठरणार आहे. आधीच प्रश्नपत्रिका मिळाल्याने आणि सोयीनुसार परीक्षा घेतल्यामुळे अप्रगत विद्यार्थ्यांचा ठपका घ्यायचा नाही, म्हणून सर्वांनाच प्रगत दाखविण्याची संधी मुख्याध्यापक, शिक्षक यांना आयतीच मिळाली आहे. त्यामुळे अप्रगत विद्यार्थी मिळणार कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही चाचणी परीक्षा गोपनीय ठेवायची नाही, सोयीनुसार घ्यायची, असा वरिष्ठांचाच आदेश असल्याचा युक्तिवाद जिल्हास्तरीय शिक्षण प्रशासन करीत आहे. गोपनीयता नसेल तर चाचणी कसली, असा प्रश्न पालक विचारीत आहेत. त्यामुळे ‘शाळाबाह्य’प्रमाणेच अप्रगत विद्यार्थी शोधमोहिमेतही प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रत्यक्षात अप्रगत असलेले विद्यार्थीही प्रगत दाखविणे सहज शक्य झाले आहे. त्यामुळे शासनाचा मूळ उद्देशच बाजूला पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.