उंड्रीचे सरपंचपद सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:22 AM2021-02-12T04:22:53+5:302021-02-12T04:22:53+5:30
कोल्हापूर : आरक्षण सोडतीवर आक्षेप घेत दाखल केलेली उंड्री (ता. पन्हाळा) ग्रामपंचायतीची याचिका जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी फेटाळली ...
कोल्हापूर : आरक्षण सोडतीवर आक्षेप घेत दाखल केलेली उंड्री (ता. पन्हाळा) ग्रामपंचायतीची याचिका जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी फेटाळली आहे. त्यामुळे या गावात जाहीर झालेले सर्वसाधारण खुल्या प्रवर्गाचेच आरक्षण कायम राहणार आहे आणि त्याप्रमाणे सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे.
आरक्षण सोडतीत चुका असल्याचे सांगत जिल्ह्यातील उंड्री, फणसवाडी, शिरटी, कोगे, खुपिरे, मजरेवाडी, गिरगाव, तळेवाडी, तमदलगे या गावांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने याची सुनावणी घेऊन निर्णय घ्यावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना काढले होते. त्यानुसार ९ व १० रोजी या गावांच्या सुनावणी पूर्ण झाल्या. मात्र, निकाल दिला नसल्याने या गावामध्ये धाकधूक वाढली होती.
गुरुवारी या ९ गावांपैकी पन्हाळा तालुक्यातील उंड्री या ग्रामपंचायतीचा निकाल दिला. येथे अजित खोत यांनी याचिका दाखल केली होती. त्यांनी नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण पडणे अपेक्षित होते, असा वकिलांकरवी युक्तिवाद केला होता. मंगळवारी झालेल्या सुनावणीत याचिकाकर्ते व प्रतिवादी यांचे म्हणणे ऐकून घेतल्याने नागरिकांचा मागास प्रवर्ग करता येत नाही, जाहीर झालेले सर्वसाधारण खुले आरक्षणच योग्य आहे आणि तेच कायम राहील असे जिल्हाधिकाऱ्यांनी निकालात स्पष्ट केले.
दरम्यान सुनावणी पूर्ण झालेल्या गावापैकी चार ग्रामपंचायतींचे निकालपत्र तयार झाले असून ते आज शुक्रवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राहिलेल्या ८ गावांत धाकधूक वाढली आहे. मंगळवार (दि.१६) पर्यंत ही निकालाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यानंतर या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे.