राज्याकडे अडकला २४५ कोटी रुपये भत्ता गृहरक्षक दलाच्या ५६ हजार : जवानांवर बेकारीची कु-हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 12:38 PM2020-02-12T12:38:17+5:302020-02-12T12:47:16+5:30

कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांना गेल्याच महिन्यात अचानक सेवेतून मुक्त केले आहे. त्यांनी बजावलेल्या सेवेचा सुमारे २४५ कोटी रुपये एकूण भत्ताही शासनाकडे प्रलंबित आहे.

Unemployment crunch on 3,000 personnel of the Home Guard | राज्याकडे अडकला २४५ कोटी रुपये भत्ता गृहरक्षक दलाच्या ५६ हजार : जवानांवर बेकारीची कु-हाड

राज्याकडे अडकला २४५ कोटी रुपये भत्ता गृहरक्षक दलाच्या ५६ हजार : जवानांवर बेकारीची कु-हाड

Next
ठळक मुद्देअचानक सेवामुक्ती

तानाजी पोवार

कोल्हापूर : पोलीस यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी, त्यांना साहाय्य करण्याचे कर्तव्य बजावणाऱ्या राज्यातील गृहरक्षक (होमगार्ड) दलाच्या सुमारे ५६ हजार जवानांवर बेकारीची कुºहाड कोसळली आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांना गेल्याच महिन्यात अचानक सेवेतून मुक्त केले आहे. त्यांनी बजावलेल्या सेवेचा सुमारे २४५ कोटी रुपये एकूण भत्ताही शासनाकडे प्रलंबित आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पाच कोटी रुपयांचा समावेश आहे. त्यामुळे गृहरक्षक जवान हवालदिल झाले आहेत.

वाहतुकीचे नियंत्रण, विविध सणासुदीचे दिवस, यात्रा, निवडणुकीचे बंदोबस्त, आदी प्रसंगी पोलिसांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून अत्यंत किरकोळ भत्त्यावर प्रामाणिकपणे सेवा बजावणा-या राज्यातील सुमारे ५६ हजार गृहरक्षक दलाच्या जवानांना कोणतीही पूर्वकल्पना न देता दि. १० जानेवारीपासून मुक्त करण्यात आले. त्याबाबतचे लेखी आदेश गृहरक्षक दलाचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व्ही. टी. धकाते यांनी जिल्हा समादेशकांना पाठविले.

सर्व गृहरक्षक दलाच्या जवानांना गेल्या तीन महिन्यांत भत्ता मिळाला नसल्याने तसेच त्यांना सेवामुक्त केल्याने त्यांची केविलवाणी अवस्था झाली आहे. राज्यातील सर्व गृहरक्षक जवानांच्या एकूण २४५ कोटी रुपये भत्त्याची रक्कम शासनाकडे थकीत आहे. अनेकजण उच्च शिक्षण घेऊनही मोठ्या पगाराच्या नोकरीसाठी पैसे देण्याची ऐपत नसल्याने खासगी ठिकाणी मोलमजुरी करून गृहरक्षक दलात अत्यंत तोकड्या भत्त्यावर सेवा बजावत होते; पण आता उदरनिर्वाहाचे साधन गेल्याने हे जवान सैरभैर झाले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात गृहरक्षक दलाचे सुमारे २१०० जवान सेवेत कार्यरत होते. त्यांना प्रतिदिवशी ६५० रुपये भत्ता देण्यात येत होता. त्यांना वर्षाला १४० दिवस बंदोबस्ताची सेवा देणे बंधनकारक होते. दर दोन महिन्यांना ७८० जवानांचे गट करून त्यांना दोन महिने सेवेची संधी दिली जात होती; पण आता याच जवानांवर नोकऱ्यांसाठी धावाधाव करण्याची वेळ आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्याचे पाच कोटी थकीत
कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे २१०० गृहरक्षक जवान सेवेत होते. त्यांपैकी १९०० जवानांनी गेल्या वर्षभरात टप्प्याटप्प्याने गटवार सेवा बजावली आहे. त्यांपैकी लोकसभा निवडणुकीचा बंदोबस्त केलेल्या काहींना भत्ता मिळाला; तर अनेकांना अद्याप तो मिळायचा आहे. त्याशिवाय गणेशोत्सव, विधानसभा निवडणुकीत बंदोबस्त बजावलेल्या गृहरक्षक जवानांना अद्याप भत्ता मिळालेला नाही. असा प्रत्येक जवानाचा किमान ४० हजारांपासून ७० हजार रुपयांपर्यंत भत्ता शासनाकडे प्रलंबित आहे. असे कोल्हापूर जिल्ह्याचे सुमारे पाच कोटी रुपये शासनाकडे प्रलंबित आहेत, ते मार्चअखेर देण्यात येतील, असे तोंडी सांगितले जात आहे. अखेर उदरनिर्वाहाचे साधन समोर नसल्याने गृहरक्षक दलाच्या जवानांचे जीवनमान अंधकारमय बनत आहे.

 

पोलिसांवरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने साहाय्य करण्यासाठी गृहरक्षक जवानांना बंदोबस्त दिला जात होता; पण वरिष्ठ पातळीवरून सेवामुक्तीचा आदेश आल्याने अनेक ठिकाणी कायमस्वरूपी बंदोबस्तासाठी तैनात केलेले जवान काढून घेतले आहेत.
- श्रीनिवास घाटगे, जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक, कोल्हापूर
 

Web Title: Unemployment crunch on 3,000 personnel of the Home Guard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.