उचगावच्या गुरु तळ्याला बकालपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:21 AM2021-03-19T04:21:17+5:302021-03-19T04:21:17+5:30
माेहन सातपुते उचगाव : उचगावच वैभव समजल्या जाणाऱ्या गुरु तळ्याला सध्या बकालपण आले आहे. तळ्याच्या भोवतीच कचरा कोंडाळा निर्माण ...
माेहन सातपुते
उचगाव : उचगावच वैभव समजल्या जाणाऱ्या गुरु तळ्याला सध्या बकालपण आले आहे. तळ्याच्या भोवतीच कचरा कोंडाळा निर्माण झाला असून, गावचे सांडपाणीही या तळ्यात सोडले जात असल्याने हे तळे नष्ट होते की काय अशी भीती नागरिकांमधून उपस्थित होत आहे. त्यामुळे या तळ्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी लोकसहभागाबरोबरच ग्रामपंचायतीनेही पावले उचलणे गरजेचे बनले आहे. हे तळे शासकीय निधीअभावी सुशोभिकरणापासून वंचित राहिले आहे. त्यामुळे या तळ्याच्या दुरुस्तीसाठी निधी द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. तळ्यात गवत प्रचंड प्रमाणात वाढले आहे. तळ्याच्या काठावर कचरा कोंडाळा निर्माण झाल्याने सगळीकडे अस्वच्छता पसरली आहे. तळ्याच्या पाण्यात सार्वजनिक गटाराचे सांडपाणी मिसळत असल्याने पाण्याला उग्र वास येत आहे. यापूर्वी लोकसहभागातून गाळमुक्त गावतलाव मोहीम राबविण्यात आली होती. या तलावाच्या सुशोभिकरणासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी निधी दिला होता. या निधीतून अनेक चांगली कामे झाली होती; पण गेल्या दहा वर्षात तलावाचे अस्तित्व नष्ट होते की काय, अशी अवस्था झाली आहे. यामुळे तळ्याचे सुशोभिकरण करण्याबरोबर काठावर संरक्षक भिंत, रस्ते, पेविंग ब्लॉक, रुंदावन, ज्येष्ठ नागरिकांसाठी बाकडी, लाईट व्यवस्था, पिण्याचे पाणी, सांडपाणी प्रक्रिया वाहून जाणारी गटर्स अशी कामे करण्याची गरज आहे.
कोट:
सध्या गावतळ्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. येथील बाकडी गायब झाली, पदपथ उखडून गेला आहे, विद्युत कारंजे गायब झाले असून परिसरातील नागरिक तळ्यातच कचरा टाकत असल्याने तळ्याचा कचराकोंडाळा झाला आहे, यामुळे तलावाचे सौंदर्यच हरवून बसले आहे.
नामदेव वाईगडे सामाजिक कार्यकर्ते
कोट: उचगावातील लोकांना विश्वासात घेऊन तळ्याचे सुशोभिकरण करण्यासाठी सहकार्य घेणार आहे. पालकमंत्री सतेज पाटील, आम. ऋतुराज पाटील,खासदार संजय मंडलिक यांच्याकडे निधीची मागणी करणार आहे. विरंगुळा केंद्र, पेविंग ब्लॉक, बाकडी, सभोवताली संरक्षक भिंत, सेल्फी पॉईंट, लाईट व्यवस्था केली जाणार आहे. गावच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या तळ्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वांचे सहकार्य घेणार आहे.
मालूताई काळे
लोकनियुक्त सरपंच, उचगाव.
फोटो : १८ उचगाव तळे
ओळ :-
उचगाव येथील गावतळ्याची अवस्था दयनीय झाली आहे. निधीअभावी तळ्याचे काम रखडले आहे.