विमानतळावर उडाली कागदी विमाने --कोल्हापूरची विमानसेवा रखडल्याचा केला निषेध शिवसेनेचे अनोेखे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 01:05 AM2017-12-24T01:05:51+5:302017-12-24T01:05:59+5:30
कोल्हापूर / उचगाव : सुरू होणार..सुरू होणार अशी नुसती चर्चा; परंतु प्रत्यक्षात काय विमान हवेत झेप घेत नाही असा अनुभव येत असलेल्या कोल्हापूरकरांचा राग
कोल्हापूर / उचगाव : सुरू होणार..सुरू होणार अशी नुसती चर्चा; परंतु प्रत्यक्षात काय विमान हवेत झेप घेत नाही असा अनुभव येत असलेल्या कोल्हापूरकरांचा राग शिवसेनेने शनिवारी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत व्यक्त केला. यावेळी हवेत कागदी विमाने उडवून शिवसैनिकांनी डान्स करत विमानसेवा रखडल्याचा निषेध व्यक्त केला.
खासदारांनी नुसतेच संसदेत प्रश्न मांडले, मंत्र्यांना निवेदन दिले, वरिष्ठ अधिकाºयांची बैठक घेतल्याचा फार्स करत असून जनतेशी ते खेळ करत असल्याची टीका यावेळी खासदार धनंजय महाडिक यांच्यावर करण्यात आली.
राजाराम महाराजांनी दूरदृष्टीने विमानतळ बांधले; परंतु गेली सहा वर्षे ही विमानसेवा बंद आहे. विमानतळ विस्तारीकरणासाठी उजळाईवाडी, नेर्ली, तामगाव, गोकुळ-शिरगाव या भागातील शेतकºयांनी मातीमोल किमतीने ६५० हेक्टर जमिनी दिल्या. विमानतळाचे विस्तारीकरण राहू दे. किमान नियमित विमानसेवाही सुरू नाही. या प्रश्नाची दोन्ही खासदारांनी दखल घेऊन ही सेवा तातडीने सुरू करावी, अन्यथा शिवसेना गप्प बसणार नाही, असा इशारा जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिला.
कार्यकर्त्यांनी सकाळी विमानतळावर धडक दिली. जाताना हे कार्यकर्ते विमानाची फायबरची प्रतिकृती घेऊन गेले होते. ती विमानतळावर ठेवून असले तरी विमान आता लोकांना उडताना दाखवा, अशी अपेक्षा व्यक्त करत कार्यकर्त्यांनी कागदी विमाने हवेत उडवून सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
यावेळी सुजित चव्हाण, दुर्गेश लिंग्रस, शिवाजीराव जाधव, राजू यादव, विनोद खोत, शुभांगी पोवार, कमलाकर जगदाळे, दत्ता टिपुगडे, शशी बीडकर, भगवान कदम, सुनील पोवार, चंद्रकांत पंडित, अवधूत साळोखे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
नामफलकाचे उद्घाटन
विमानतळ प्राधिकरणाच्या नामफलकाला शिवसैनिकांनी पुष्पहार अर्पण करून फीत कापून त्याचे उद्घाटन केले. या आंदोलनावेळी दोन खासदारांची वेशभूषा करून समीर भोरे व स्वप्नील येळेकर आले होते. त्यांच्यावर शिवसैनिकांनी फुलांचा वर्षाव करत टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. आंदोलन ठिकाणी तिकीट विक्री कक्ष उभारला होता.