अभूतपूर्व यश : महिनाभरातील टेन्शन दूर; आता महाविद्यालयाचे वेध

By admin | Published: June 9, 2015 01:06 AM2015-06-09T01:06:07+5:302015-06-09T01:17:47+5:30

वडिलांचा स्क्रॅपचा व्यवसाय पाहत ‘साबिया’ने मिळविले ७४ टक्के

Unforgettable success: Tensions away in a month; Now the perforation of the college | अभूतपूर्व यश : महिनाभरातील टेन्शन दूर; आता महाविद्यालयाचे वेध

अभूतपूर्व यश : महिनाभरातील टेन्शन दूर; आता महाविद्यालयाचे वेध

Next

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सोमवारी दुपारी ‘आॅनलाईन’ निकाल जाहीर झाला अन् गेले महिनाभर टेन्शनमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या छटा उमटल्या. कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल तब्बल ९५.५६ टक्के जाहीर झाला. अनेक विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळविलेले यश हे धवलच म्हणावे लागेल. विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून दिवसभर मोलमजुरी करणाऱ्या माता-पित्याची तसेच ुुशिक्षकांची स्वप्नपूर्ती केली. त्यांच्या कष्टाला अखेर यशाची झालर मिळाली.

कोल्हापूर : वडिलांचा स्क्रॅपचा व्यवसाय सांभाळत साबिया मेहबूब इनामदार हिने दहावीच्या परीक्षेत ७४ टक्के गुण मिळविले आहेत. तिच्या या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे. सदर बाजार येथील कोरगावकर हायस्कूलची ती विद्यार्थिनी आहे.
नियमित सकाळी दोन तास अभ्यास करणे व दिवसभरात वेळ मिळेल तेव्हाच अभ्यास करणे हे तिच्या दहावीच्या अभ्यासाचे वेळपत्रक बनले होते. वडील आजारी असल्याने शाळा सुटल्यानंतर भावासोबत स्क्रॅपचा व्यवसाय सांभाळत तिने अभ्यास केला. दहावीच्या परीक्षेच्या वेळाला मोठ्या बहिणीचे लग्न ठरल्याने घरच्या सर्व कामांत मदत करीतच तिने दहावीची परीक्षा दिली व हे यश मिळविले. वडिलांच्या स्क्रॅपच्या दुकानात आलेली जुनी मेहंदीची पुस्तके पाहून तिला मेहंदी काढण्याची आवड निर्माण झाली. लग्नसोहळ्यात मेहंदी काढून ती घरखर्चाला हातभार लावत आहे.
कोणतीही खासगी शिकवणी न लावता फक्त शाळेत शिक्षकांनी शिकविलेल्या अभ्यासाचा मला फायदा झाला. मला नेहमी माझे वडील, आई, आजी, दोन बहिणींसह भावासह भारत रसाळे सरांनी दिलेल्या प्रोत्साहनाने मी हे यश मिळविले आहे. मला आता वाणिज्य शाखेत प्रवेश घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे, असे साबियाने सांगितले.
तस्लिमा बारगीर नेहरू हायस्कूलमध्ये प्रथम
रिक्षाचालकाच्या कन्येचे लख्ख यश
कोल्हापूर : दहावीसाठी कोणत्याही विषयाची खासगी शिकवणी नाही. फक्त शाळेतील शिक्षकांनी शिकविलेल्या अभ्यासावर राजेंद्रनगर येथील तस्लिमा अस्लम बारगीरने नेहरू हायस्कूलमध्ये मराठी माध्यम शाखेत प्रथम क्रमांक पटकाविला. तस्लिमांचे वडील रिक्षा व्यावसायिक आहेत.
राजेंद्रनगर शाहू पार्क येथे राहणाऱ्या तस्लिमाने जिद्द व चिकाटीच्या जोरावर ही यशस्वी वाटचाल करून अनेकांना थक्क केले आहे. तस्लिमांच्या दोन्ही बहिणींनी दहावी व बारावीमध्ये चांगले गुण मिळविले होते. दहावी म्हटले की, प्रत्येक विषयाला खासगी शिकवणी लावण्याची फॅशनच, पण या सर्व गोष्टींना तस्लिमाने फाटा दिली. दहावीला कोणत्याही विषयांची शिकवणी न लावता शाळेतील शिक्षकांनी शिकविलेल्या अभ्यासाची उजळणी दररोज घरी करायची. घरच्या कामात आईला मदत करीत परीक्षा जवळ आल्यानंतर तिने नियमित पाच ते सहा तास अभ्यास करण्याचे नियोजन केले होते. अभ्यासाच्या या नियोजनामुळेच तिने नेहरू हायस्कूलमध्ये मराठी माध्यम शाखेत ६८.८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. तिला शिक्षक व्हायचे असल्यानेच हीच जिद्द मनाशी बाळगून ती अभ्यास करीत आहे. तिला यासाठी तिचे वडील, आई, बहीण यांचे प्रोत्साहन मिळत आहे.

प्रत्येक विषयात ३५ गुण!
अर्जुनवाडच्या इंद्रजित मोरे याचे अनोखे यश
कोल्हापूर : प्रत्येक विषयात उत्तीर्ण होण्यासाठी लागणारे नेमके ३५च गुण पाडण्याची पैज लावली जात होती; पण पैज लावूनसुद्धा कोणालाही सर्व विषयांत ३५ गुण मिळवता येत नव्हते. मात्र, अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथील दत्ताजीराव कदम हायस्कूलचा विद्यार्थी इंद्रजित वसंत मोरे यास दहावीच्या परीक्षेत सर्व विषयांत ३५ टक्के गुण मिळाले. या आश्चर्यकारक गुणांमुळे अर्जुनवाडसह कुरुंदवाड, जयसिंगपूर, घालवाड, दत्तवाड, आदी पंचक्रोशीत चर्चा होत आहे.
एस.एस.सी. परीक्षेत चांगल्या गुणांनी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असते. यामध्ये ९५ टक्क्यांच्यावरती गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंतांची चर्चा नेहमीच होत असते. मात्र, नापास आणि पासच्या काठावर उभ्या असणाऱ्या विद्यार्थ्यांची चर्चा होताना कमी दिसते. सर्व विषयांत पास होण्यासाठी साधारणत: १०० पैकी नेमके ३५ गुण पाडणे शक्य नसते. कारण आपण केवळ ३५ गुणांचेच लिहित नाही; तर पास होण्यासाठी १०० गुणांची सर्व प्रश्नपत्रिका सोडवली जाते. यात जे गुण पडतात, ते ठरवून अथवा तितके लिहिले म्हणून पडत नाहीत. मात्र, लाखात एक अपवाद म्हणून नेमक्या सर्व विषयांत ३५ गुण कसे मिळतात, याचे आश्चर्य सर्वांना आहे. याचा प्रत्यय सोमवारी अर्जुनवाडमधील इंद्रजित मोरे या विद्यार्थ्यास आला. त्याला पडलेल्या सर्व विषयांतील ३५ टक्के गुणांमुळे आपण नापास होता होता वाचलो, याचा आनंद आहे. मात्र, एवढे कमी गुण कसे मिळाले, याचेही त्याला आश्चर्य वाटत आहे. त्याला खरंच सर्व विषयांत ३५ गुण पडलेत का? असा सवाल सर्वजण त्याच्या वडिलांना फोनवरून विचारत आहेत. इंद्रजित हा अर्जुनवाड येथील बाबर स्पोर्टस् क्लबचा कबड्डीपटू आहे. इंद्रजित यास प्रतिक्रिया विचारली असता तो म्हणाला, मी ३५ पेक्षा अधिक गुणांचा पेपर लिहिला होता. परंतु, मला आश्चर्यकारकरीत्या पास होण्यासाठी लागणारे किमान गुण ३५ च पडले. त्यामुळे माझ्यासह घरातील सर्वांना आश्चर्य वाटते. जशी ही बातमी समजेल, तशी मला व वडिलांना विचारणा होत आहे. यावर अनेकजणांनी तर ‘अरे मोजून ३५च गुण पाडणे एवढे सोपे काम नाही’, अशी प्रतिक्रिया दिली! यापुढे याहीपेक्षा चांगला अभ्यास करून बारावी परीक्षेत अधिक गुण मिळवून दाखवणार आहे.

Web Title: Unforgettable success: Tensions away in a month; Now the perforation of the college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.