कोगे येथील राष्ट्रीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 03:08 PM2019-09-23T15:08:58+5:302019-09-23T15:10:42+5:30
कोगे (ता. करवीर) येथील मोरे मळा परिसरातील झाडावर चढून पुरात वाहून आलेले वाळलेले झाड बाहेर काढत असताना ते अंगावर पडून गंभीर जखमी झालेल्या राष्ट्रीय कुस्तीपटूचा सीपीआर रुग्णालयात उपचारापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाला. विक्रम भगवान मोरे (वय २५) असे त्याचे नाव आहे. विक्रम आपल्या अन्य तिघा मित्रांसमवेत गेला असताना ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सावरवाडी : कोगे (ता. करवीर) येथील मोरे मळा परिसरातील झाडावर चढून पुरात वाहून आलेले वाळलेले झाड बाहेर काढत असताना ते अंगावर पडून गंभीर जखमी झालेल्या राष्ट्रीय कुस्तीपटूचा सीपीआर रुग्णालयात उपचारापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाला. विक्रम भगवान मोरे (वय २५) असे त्याचे नाव आहे. विक्रम आपल्या अन्य तिघा मित्रांसमवेत गेला असताना ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, भोगावती नदीला आलेल्या महापुरात मोरे मळा परिसरात वाहून आलेले वाळलेले झाड शेजारच्या एका झाडावर अडकले होते. ते घरी घेऊन जाण्यासाठी विक्रम आपल्या तिघा मित्रांसमवेत मोरे मळा परिसरात रविवारी दुपारी आला होता. वाळलेले झाड १५ फूट उंच शेजारील झाडावर अडकले होते. ते काढण्यासाठी विक्रम झाडावर चढला. वाळलेल्या झाडाला दोन्ही हातांनी धक्का देत असताना झाड उभे होऊन थेट त्याच्या अंगावर कोसळले.
चेहरा आणि छातीला जोराचा मार लागून तो चढलेल्या झाडाच्या खोचात अडकून पडला. खाली उभ्या असलेल्या मित्रांनी आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूचे लोक मदतीसाठी आले. त्यांनी वर झाडावर अडकून पडलेल्या विक्रमला बेशुद्धावस्थेत खाली उतरविले. तेथून त्याला तत्काळ ‘सीपीआर’मध्ये दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
विक्रमच्या मृत्यूचे वृत्त समजताच ग्रामस्थ, नातेवाइकांनी ‘सीपीआर’मध्ये गर्दी केली. नातेवाइकांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. करवीर पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे.
देशात गावाचे नाव उज्वल
कोगे गावातील कुस्ती क्षेत्रातील विक्रम हा नामवंत मल्ल होता. त्याने आॅल इंडिया कुस्ती चॅम्पियनशिप प्राप्त केली होती. त्याने आंतरराष्ट्रीय पदके पटकावून कोगे गावाचे नाव देशात उज्ज्वल केले होते. राष्ट्रीय कुस्तीपटू म्हणून त्याचा नावलौकीक होता. काळम्मादेवी केसरी गदा (आमशी) व कुमार कामगार केसरी गदा (पुणे) यांचा तो मानकरी ठरला होता. कुडित्रे नंतर सध्या तो पुणे येथील सह्याद्री कुस्ती संकुलमध्ये सराव करीत होता.
खिलाडू वृत्ती
विक्रम हा लहानपणापासूनच खिलाडू वृत्तीचा होता. धाडसी असल्याने तो प्रत्येक कामात पुढे असायचा. त्याचे वडील शेती करतात. अतिशय कष्टातून त्यांनी विक्रमला पैलवान बनविले होते. त्यांचे स्वप्नही विक्रमने पूर्ण केले होते. त्याने आपल्या कुस्तीच्या डावपेचांतून अनेक मल्ल घडविले आहेत. त्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे तालुक्यातील पैलवान, कुस्तीशौकीन शोकसागरात बुडाले.