सर्जनशीलतेचा मागोवा घेणारा अस्वस्थ कलावंत

By admin | Published: May 6, 2016 12:28 AM2016-05-06T00:28:29+5:302016-05-06T01:13:09+5:30

संजय पाटील... सहा फूट उंचीच्या देहकाठीवर दांडगा हंडा ठेवावा, तसं मोठं डोकं असलेला.

Unhealthy Artists Tracking Creativity | सर्जनशीलतेचा मागोवा घेणारा अस्वस्थ कलावंत

सर्जनशीलतेचा मागोवा घेणारा अस्वस्थ कलावंत

Next

गुणीजन
अस्वस्थता एखाद्या कलावंताच्या कलानिर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्जनशीलतेमागची मूस असते. परिस्थितीतले विरोधाभास, जगण्याचा संघर्ष त्याच्या अभिजाततेला झळाळी देत असतात. त्याच्या हातून जणू उत्तमोत्तम कलाकृती घडवून घेत असतात. म्हणूनच साहित्य आणि नाट्य चळवळीत कर्तृत्वाची स्वतंत्र मोहोर उमटविणारा आमचा मित्र संजय पाटील याला नोकरी लागल्यावर ज्येष्ठ समीक्षक म. द. हातकणंगलेकर सर एकदा म्हणाले होते, ‘संजय पाटील यांना आकाशवाणीत नोकरी मिळाली, यासारखी उत्तम गोष्ट नाही. मात्र त्यांच्यातला कलावंत संपला.’ बावीस वर्षांपूर्वी अगदी कोवळ्या वयातच साहित्य, नाटक आणि संगीतानं पछाडलेला, प्रचंड वाचन असलेला, नाटकांच्या तालमीत आणि प्रयोगशीलतेत तहान-भूक हरवून, झोकून देणारा वेगळ्या धाटणीचा कलावंत.

‘उसवत्या देहानं
नागवं ऊन झेलंत
झिप्री रानोमाळ उधाणते
तेव्हा खुरट्या झुडपांनाही
दडवता येत नाहीत
त्यांचे आगंतुक हिरवट डोळे...’
अशी वेगळ्याच धाटणीची मराठी कवितेची चित्रलिपी मांडणारा कवी संजय पाटील, नोकरीच्या सुरक्षित उबदार वातावरणात हरवला असावा, असं हातकणंगलेकर सरांना वाटलं असावं. संजय पाटील... सहा फूट उंचीच्या देहकाठीवर दांडगा हंडा ठेवावा, तसं मोठं डोकं असलेला. झुलीसारख्या नेहरू शर्टाच्या खांद्याच्या बावट्यावर तरंगणारी कवी-कल्पनांची वीज शबनममध्ये बांधून ठेऊन फिरणारा. घोगऱ्या आवाजात अडखळत तोतरं बोलणारा. आपल्या मतांशी ठाम असणारा. फटकळ आणि कलंदर कलावंत. पण महाविद्यालयीन जीवनापासूनच नाटक, एकांकिका आणि पथनाट्यातली त्यांची अजोड कामगिरी बघितली किंवा आकाशवाणीवर हंगामी निवेदक म्हणून केलेल्या त्यांच्या उद्घोषणा ऐकल्या की, हा माणूस बोलताना अडखळतो, हे ऐकणाऱ्याला सांगूनही पटायचं नाही. इतकंच काय, नंतर त्याच्या कथाकथनाच्या दोन ध्वनिफिती आल्या. आकाशवाणीवर अधिकारी म्हणून काम करत असताना त्यानं राजन गवस यांची ‘चौंडकं’, आनंद यादवांची ‘नटरंग’ आणि गो. नि. दांडेकरांची ‘श्री गाडगे महाराज’ या कादंबऱ्यांचं प्रभावी वाचन केलं. त्यातून सांगलीकरांना त्याची वेगळी ओळख झाली.
‘झाडाझडती’सारख्या महाकादंबरीचं १३ भागात केलेलं जबरदस्त नभोनाट्य रूपांतर श्रोत्यांची मन जिंकून गेलं. अनेक नभोनाट्यांचं लेखन आणि सादरीकरण संजयनं केलंय. त्यातल्या चारुता सागर यांच्या ‘पूल’ या कथेचा आवर्जून उल्लेख करावा लागेल, तो त्यातल्या उत्तम ध्वनिसंयोजनातून उभ्या केलेल्या वातावरण निर्मितीला.
आकाशवाणीचा शेती विभाग संजय पाटलांनी कल्पकतेने लोकाभिमुख केला. शेतीशाळेचे साडेचारशे पाठ लिहिले. पाटलांचा कृषिवार्तातला ‘राम राम मंडळी’ हा आवाज लोकांच्या कानात बसला होता.
संजय पाटलांनी आकाशवाणीवरची अनेक रूपकं आपल्या अभ्यासू, चतुरस्र कल्पकतेतून रोचकपणे मांडली आहेत. ‘पोरवय जपायला हवं’ हे रवींद्रनाथ टागोरांच्या बालकवितेवरलं रूपक असो, की संत रामदासांच्या सांगीतिक ज्ञानाचं लोकांना ठावूक नसलेलं वेगळेपण मांडणारं रूपक असो, त्यांच्या वेगळेपणाची मोहोर त्यावर असायची. असं असलं तरीही संजय पाटलांची कवी आणि नाट्य कलावंत म्हणून ओळख साहित्य आणि नाट्य क्षेत्राला पदोपदी आठवायची, ती त्यांच्या चळवळीच्या दिवसांतील कर्तृत्वामुळेच.
खणभागातल्या एका सर्वसामान्य कुटुंबातला हा मुलगा. ‘एका इमारतीचा गाव’चे नाटककार प्रदीप पाटील या भावाप्रमाणेच वेगळी प्रतिभा घेऊन आला आहे. याचं सगळ्यांनाच अप्रूप वाटायचं. ‘इस्कोट’ ही संजयची पहिली एकांकिका. विवेक नाईक आणि संजय पाटील तिचं अफलातून सादरीकरण करायचे.
प्रायोगिक नाटकांच्या चळवळीत ज्यांचा दबदबा होता, असे प्रा. अरुण पाटील यांचा संजय चेला. त्यांची अ‍ॅमॅच्युअर ड्रॅमॅटिक असोसिएशन, बी. एन. चौगुले सरांची नाट्य शुभांगी (जयसिंगपूर) आणि दादा कडणेंची श्री युनिट या संस्थांमधून संजयची नाट्यचळवळ प्रगल्भ होत गेली. ‘रिंगण, मुंजा, तू वेडा कुंभार, बिकटवाट वहिवाट, विनाशपर्व’ या नाटकांतून प्रभावी अभिनेता म्हणून त्याची भूमिका सिद्ध झाली, तर ‘मी लाडाची मैना तुमची’ आणि ‘दिनकर पुरोहितचा मृत्यू’ ही नाटकं त्यानं अतिशय वेगळेपणानं दिग्दर्शित केली.
त्याच्या कविता व कथांतून दिसणारी चमक त्याच्यात असलेल्या कसदार लेखणीची जाणीव करून देतात. याबाबत हातकणंगलेकर, तारा भवाळकर, शिवाजी गोखले आणि प्रा. मोहन पाटील यांच्यासारख्या साहित्यिकांच्या आस्थेमधून जाणवत असायचं. संजय पाटील यांनाही त्यांच्यामधला कवी-लेखक-दिग्दर्शक-नट शांत बसू देत नसावा. पुन्हा त्या सर्जनशील जगाशी जोडलं जाता यावं, म्हणून चारच दिवसांपूर्वी संजय पाटलांनी आकाशवाणीच्या आपल्या समृद्ध कर्तृत्व प्रवासातून स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या यापुढच्या कल्पक, सर्जनशील जीवन प्रवासाला शुभेच्छा.!
- महेश कराडकर
 

Web Title: Unhealthy Artists Tracking Creativity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.