एकीअभावी मराठा नेतृत्वाला पंतप्रधानपद दूर
By admin | Published: January 7, 2017 01:26 AM2017-01-07T01:26:21+5:302017-01-07T01:26:21+5:30
विजय नाईक : कोल्हापूर प्रेस क्लबच्या विविध पुरस्कारांचे वितरण; शरद पवार सर्वपक्षीय संबंध असणारे नेते
कोल्हापूर : सत्तर वर्षांत उत्तर प्रदेश, पंजाब, कर्नाटक, गुजरात आदी राज्यांतील नेतृत्वाला पंतप्रधानपदाची संधी मिळाली; परंतु महाराष्ट्राला प्रगल्भ नेतृत्व, सांस्कृतिक, व्यापार, राजकीय व संत-महंतांचा वारसा असूनही दिल्लीच्या धोरणाने मराठा नेतृत्वाला एकत्र येऊ दिले नाही. मराठा नेतृत्वातही एकीचा अभाव आहे. त्यामुळे आजपर्यंत मराठी नेता पंतप्रधानपदापर्यंत पोहोचू शकला नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक यांनी शुक्रवारी केले.
पत्रकार दिनानिमित्त राजर्षी शाहू स्मारक भवन येथे कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे आयोजित समारंभात पुरस्कार वितरणप्रसंगी ते ‘पत्रकारिता आणि भारतीय राजकारण’ यावर बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार राजू शेट्टी होते. मान्यवरांच्या हस्ते ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमाचे पूजन करण्यात आले. यावेळी ‘उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारा’ने विजय पाटील (दैनिक पुढारी), सुनील काटकर (टीव्ही नाईन कॅमेरामन), ‘उत्कृष्ट छायाचित्रकार’ पुरस्काराने पांडुरंग पाटील (दैनिक पुण्यनगरी) यांना गौरविण्यात आले. रोख ५००१ व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
ज्येष्ठ पत्रकार नाईक म्हणाले, दिल्लीत महाराष्ट्राच्या नेतृत्वाचे तीन टप्पे दिसतात. त्यामध्ये यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार यांनी महत्त्वाची खाती सांभाळली. यशवंतराव चव्हाण २३ वर्षे दिल्लीत होते. वसंतदादा पाटील यांना तर ‘दिल्ली’ घाबरायची. शरद पवार यांचा गेल्या २२ वर्षांपासून दिल्लीशी संबंध आहे. ‘सर्वपक्षीय संबंध असलेला एकमेव नेता’अशी त्यांची ओळख आहे. या तिघांचेही दिल्लीच्या राजकारणात मोठे योगदान आहे; तरी एकही मराठा नेतृत्व पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले नाही. नाईक यांनी भाषणादरम्यान दिल्लीत पत्रकारिता करत असताना आलेले अनुभव, विविध किस्से, राजकीय स्थित्यंतरे, महाराष्ट्रातील राजकारण यांचा मागोवा घेतला. दरम्यान, जाहिरात क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल अलंकार पब्लिसिटीचे राजाराम शिंदे तसेच दै. ‘तरुण भारत’चे निवासी संपादक जयसिंग पाटील, ‘लोकमत’चे उपवृत्त संपादक चंद्रकांत कित्तुरे, ‘महाराष्ट्र टाईम्स’चे सहायक संपादक गुरुबाळ माळी,
‘दै. पुढारी’च्या प्रिया सरीकर, ‘केसरी’च्या अश्विनी टेंबे यांचा सत्कार करण्यात आला.
खासदार राजू शेट्टी म्हणाले, मनमोहन सिंग लोकनेते नसले तरी त्यांच्या कार्यकाळात विरोधक व सत्ताधाऱ्यांत संवाद होता. विरोधकांचे प्रश्न, मुद्दे समजून घेतले जायचे. एखाद्या मुद्द्यावर गटनेत्यांच्या बैठका, पक्षप्रमुखांशी चर्चा व्हायची; परंतु सध्या हा संवाद होत नाही. त्यासाठी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजनही पुढाकार घेत नाहीत. विरोधी पक्ष हा लोकशाहीचा प्रमुख घटक आहे, परंतु त्यांच्याशी संवाद तुटल्याचे जाणवते. इंदिरा गांधींच्या काळाची प्रचिती यावी असे वातावरण संसदेत दिसते.
प्रास्ताविकात कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी वर्षभरात राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. ‘महाराष्ट्र टाईम्स’चे निवासी संपादक विजय जाधव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. शुभदा हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष संतोष पाटील यांनी आभार मानले.
बहुमताच्या जोरावर एककल्ली कारभार
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात संवाद हरवत चालला आहे, अशी खंत व्यक्त करत विजय नाईक म्हणाले, पंतप्रधान पत्रकारांशी संवाद साधत नाहीत. याउलट ते थेट फेसबुक, इंस्ट्राग्राम, ‘टिष्ट्वटर’च्या माध्यमातून थेट जनतेशी संपर्क साधतात. संसदेतही ते विरोधकांशी कोणत्याही विषयावर चर्चा करत नाहीत. त्यांच्याकडून बहुमताच्या बळावर एककल्ली कारभार हाकला जात आहे.
दिल्लीत मराठा नेतृत्वाचे खच्चीकरणच
संत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगात ‘मराठा तितुका मिळवावा’ असे म्हटले आहे. सध्या मात्र दिल्लीच्या राजकारणात मराठा नेतृत्वाचे खच्चीकरणच करण्यात येत आहे. यशवंतराव चव्हाण यांनी सुरुवातीच्या काळात उपपंतप्रधानपद भूषविले. मात्र, त्यानंतरच्या नेत्यांना दिल्लीतील राजकारणामुळे पंतप्रधानपदाची संधी मिळालेली नाही.