विनाअट सरसकट कर्जमाफी द्या
By admin | Published: June 27, 2017 07:00 PM2017-06-27T19:00:04+5:302017-06-27T19:00:04+5:30
श्रमिक मुक्ती दलाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २७ : राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली असली तरी अटीमुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहणार आहेत. यासाठी विनाअट सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
शेतीमालाला उत्पादनखर्चावर आधारीत भाव नाही, शेतीमाल प्रक्रिया उद्योग नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर दिवसेंदिवस कर्जाचा डोंंगर वाढत आहे. या कर्जाला कंटाळून शेतकरी आत्महत्येकडे वळत आहे. कर्जमाफी करून त्यांच्या गळ्याभोवतीचा फास काढून टाकण्याची मागणी शेतकरी करत आहे. शेतकऱ्यांनी संपाचे हत्यार उपसून आंदोलन सुरू केल्यानंतर सरकारने कर्जमाफीची घोषणा केली; पण त्यातही ‘तत्त्वत: ’ व ‘सरसकट’ या दोन शब्दाने शेतकऱ्यांचा घात करण्यास सुरुवात केली आहे. सरकारने शब्दांचा खेळ बंद करून प्रत्यक्षात कर्जमाफी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
टाऊन हॉल येथून मोर्चास सुरुवात झाली. मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हाप्रमुख मारुती पाटील, डी. के. बोडके, शंकर पाटील, आनंदा आमकर, अशोक पाटील, वसंत पाटील, पांडुरंग पवार, दाऊद पटेल, आनंदा गोटल, आकाराम झोरे, भगवान बोडके, पांडुरंग कोठारे, जगन्नाथ कुरतुडकर, दगडू पाटील आदी उपस्थित होते.