बिनविरोधने एकसंधतेचा ‘बुरुज’ मजबूतच !

By admin | Published: July 5, 2017 12:57 AM2017-07-05T00:57:40+5:302017-07-05T00:57:40+5:30

सदाशिवराव मंडलिक साखर कारखाना निवडणूक : संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाचा पोक्तपणाही सिद्ध

Uninterrupted 'bastion' is strong! | बिनविरोधने एकसंधतेचा ‘बुरुज’ मजबूतच !

बिनविरोधने एकसंधतेचा ‘बुरुज’ मजबूतच !

Next

दत्तात्रय पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क
म्हाकवे : सदाशिवराव मंडलिक यांच्या निधनानंतर मंडलिक गटासह कारखान्याच्या निवडणुकीचे काय होणार, याबाबत भल्या-भल्यांनाही अंदाज करणे अशक्य वाटत होते. मात्र, प्रा. संजय मंडलिक यांनी अतिशय शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्वक कार्यकर्त्यांना एकसंध करून मोट बांधली. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याअगोदरच तालुक्यातील प्रमुख नेतेमंडळींसह गावा-गावांत कार्यकर्त्यांच्या गाठी-भेटी घेऊन कारखान्याच्या बिनविरोध निवडणुकीसाठी साद घातली आणि तालुक्यातील सर्वांनीच प्रतिसाद देत मंडलिक कारखाना बिनविरोध करून संघर्षाला फाटा दिला. यामुळे दिवंगत मंडलिकांप्रमाणे प्रा. मंडलिकांच्या नेतृत्वगुणाचा ‘पोक्तपणा’, पूर्वीप्रमाणेच मंडलिक गटाचा ‘बुरूज’ आजही एकसंध असल्याचे सिद्ध झाले आहे.
शून्यातून राजकीय विश्व निर्माण करणाऱ्या कै. सदाशिवराव मंडलिक यांनी तब्बल ४० वर्षे जिल्ह्याच्या राजकारणात आपला वट निर्माण केला होता. याचे मुख्य कारण काय असेल, तर त्यांची निष्ठावंत कार्यकर्त्यांची फौज ठामपणे पाठीशी होती. तर मंडलिकांनीही आपल्या कार्यकर्त्यांना कधीही वाऱ्यावर न सोडता सहकार, शैक्षणिक क्षेत्रांत राजकीय पदे बहाल केली. रक्ताचा वारस असणाऱ्या संजय मंडलिकांना बाजूला ठेऊन अल्पसंख्याक असणाऱ्या आमदार हसन मुश्रीफांना त्यांनी राजकीय वारस म्हणून पुढे आणले. त्यांच्या समन्वयाची पद्धती आणि कार्यकर्त्यांना लावलेल्या कडक शिस्तीमुळेच त्यांनी राजकीय जीवनात यशस्वी प्रवास केला.
त्यामुुळे ते नेहमी म्हणत, ‘कार्यकर्ते हेच माझे शक्तीस्थान आहे.’ राजकीय पदे वाटप करताना मंडलिक सर्वसमावेशक व्यक्ती आणि जनसामान्यांमध्ये आदराचे स्थान असणाऱ्यांचीच निवड करत, तर मंडलिकांना निवडणुकीत विजय मिळो अगर न मिळो त्यांच्याबाबत राजकीय परिस्थिती अनुकूल असो अथवा प्रतिकूल असो मात्र, एकही कार्यकर्ता गट सोडून बाजूला गेलेला नाही.
त्यांनी बनविलेल्या वाटेवरून प्रवास करत प्रा. संजय मंडलिक यांनीही गटातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांसह अनुभवी मंडळींना एकत्रित करून या कारखान्याच्या बिनविरोध निवडणुकीचे शिवधनुष्य हाती घेतले. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची वाट न पाहता चार महिने अगोदरच गावा-गावात जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी व मेळावे घेतले. मंडलिक कारखान्यातील प्रमुख विरोधक असणाऱ्या आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह माजी आमदार संजय मंडलिक, ‘शाहू’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या या विशेष प्रयत्नामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्यात ते यशस्वी झाले.
दरम्यान, नवीन संचालक मंडळाची निवड करताना संजय मंडलिकांसह सुकाणू समितीने १० जुन्या अनुभवी आणि ११ नव्या संचालकांना संधी देऊन कारखाना प्रशासन आणि गटाचा समतोल साधत मेळ घातला आहे. नव्याने संधी दिलेल्या संचालकांचे त्या-त्या गावातील कार्ये आणि मंडलिक गटाची निष्ठा याची पटपडताळणी करूनच सामान्य आणि काही अतिसामान्य कार्यकर्त्यांना संधी दिल्याने त्यांच्यामध्ये नवचैतन्य आले आहे.


त्यांची किल्लेदारी अबाधितच...!१ मंडलिक कारखाना हा हमीदवाडा, बस्तवडे, कौलगे आणि खडकेवाडा या चारही संगमावरील फोंड्या माळावर उभा राहिला आहे.
२ त्यामुळे या चारही गावांतील कार्यकर्ते हे कारखान्याचे सर्व किल्लेदार असल्याचा उल्लेख कै. मंडलिक करत असत. तसेच या चारही गावांत संचालकपद बहाल करण्यात आले.
३ त्याप्रमाणे प्रा. संजय मंडलिकांनीही या चारही गावांची किल्लेदारी अबाधित ठेवत त्यांना संधी दिली आहे.
‘बिद्री’च्या बिनविरोधासाठीही प्रयत्न व्हावेत
कागल तालुक्यातील मंडलिक कारखान्यासह ‘शाहू’ची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सार्वत्रिकपणे प्रयत्न होतात. मात्र, याच तालुक्यात असणाऱ्या तिसऱ्या सहकारी बिद्री कारखान्याच्या ५० ते ५५ वर्षांच्या इतिहासात निवडणूक बिनविरोध झालेली नाही. किंबहुना बिनविरोधसाठी कोणीही पुढाकार घेतला नाही किंवा तसे प्रयत्नही होताना दिसत नाहीत. याबाबत तालुक्यासह जिल्ह्यात आश्चर्य व्यक्त होत असून, या कारखान्याची आगामी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न व्हावेत, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

यांच्या निष्ठेला मिळाले फळ
मसू पाटील (उंदरवाडी), ईगल ऊर्फ चित्रगुप्त प्रभावळकर (कागल), दत्तात्रय सोनाळकर (भडगाव), मारुती काळुगडे, कैलास जाधव (कसबा सांगाव), दत्तात्रय चौगुले (हनमनाकवाडा), राजश्री चौगुले (आणुर), आप्पासाहेब तांबेकर आदींच्या निवडीबाबत तालुक्यातील कार्यकर्त्यांतून समाधान व्यक्त होत असून, त्यांच्या निष्ठेला फळ मिळाल्याचे बोलले जात आहे.

 

Web Title: Uninterrupted 'bastion' is strong!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.