केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज रात्री कोल्हापुरात; ‘कोल्हापूर’, ‘हातकणंगले’चा घेणार आढावा
By राजाराम लोंढे | Published: May 2, 2024 02:28 PM2024-05-02T14:28:21+5:302024-05-02T14:30:21+5:30
महायुतीच्या नेत्यांना देणार कानपिचक्या
कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज, गुरुवारी रात्री कोल्हापुरात येणार आहेत. कोकणातील सभा झाल्यानंतर ते उशिरा दाखल होत असून ते ‘कोल्हापूर’ व ‘हातकणंगले’ मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. महायुतीच्या नेत्यांना ते कानपिचक्या देणार असल्याचे समजते.
महायुतीचे ‘कोल्हापूर’चे उमेदवार संजय मंडलीक व ‘हातकणंगले’चे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी आतापर्यंत दिग्गज नेत्यांनी सभा घेतल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेऊन हवा तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यंतरी दोन दिवस तळ ठोकला होता, त्यांच्या जोडण्या सुरुच आहेत.
सिंधुदुर्ग -रत्नागिरी मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्यासाठी त्यांची गुरुवारी सभा होत आहे. ती सभा आटपून ते कोल्हापूरात उशिरा दाखल होणार आहेत. एका हॉटेलवर ते थांबणार असून महायुतीतील घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत. विशेषता भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी-माजी आमदार, पदाधिकारी यांच्याशी ते व्यक्तीगत बोलणार आहेत. आगामी चार दिवसात कशा पध्दतीने प्रचार यंत्रणा सक्रीय करायची, याबाबत ते मार्गदर्शन करणार आहेत. त्याशिवाय काही महत्वाचे नेत्यांसह व्यावसायिकांशी ते चर्चा करणार असल्याचे समजते.