शिवनिष्ठा ग्रुपची गड संवर्धन मोहीम-कोल्हापूरच्या युवकांचा अनोखा उपक्रम : किल्ले- स्मारकांची स्वच्छता; जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 11:49 PM2019-02-11T23:49:13+5:302019-02-12T00:08:52+5:30
येथील ‘शिवनिष्ठा ग्रुप’च्या जिल्ह्यातील सुमारे दोनशे शिवप्रेमी युवकांनी आठजणांच्या समितीच्या मार्गदर्शनाखाली किल्ले संवर्धन, पन्हाळा व स्मारकांची स्वच्छता मोहीम तसेच जनजागृतीची मोहीम गेल्या वर्षभरापासून हाती घेतली असून,
शेखर धोंगडे।
कोल्हापूर : येथील ‘शिवनिष्ठा ग्रुप’च्या जिल्ह्यातील सुमारे दोनशे शिवप्रेमी युवकांनी आठजणांच्या समितीच्या मार्गदर्शनाखाली किल्ले संवर्धन, पन्हाळा व स्मारकांची स्वच्छता मोहीम तसेच जनजागृतीची मोहीम गेल्या वर्षभरापासून हाती घेतली असून, दर महिन्याला हे सर्व शिवप्रेमी प्रसिद्धीपासून दूर राहत सामाजिक बांधीलकी जपत कर्तव्य पार पाडत आहेत.
आजपर्यंत या शिवप्रेमी सदस्यांनी महिन्यातून एकदा पन्हाळगड, कळंबा तलाव, शहरातील स्मारक यांची स्वच्छता केली आहे. सद्य:स्थितीवर त्यांनी पन्हाळगड व किल्ले संवर्धन मोहीम राबविण्यावर लक्ष केंद्रित केले असून, ‘किल्ले काल, आज व उद्या’ यासंबंधीची जनजागृती तरुणांमध्ये करीत आहेत.
पन्हाळानजीकचा पावनगड आजही दुर्लक्षित असून, पर्यटक केवळ पन्हाळा पाहून पुढील प्रवासाला निघतात म्हणून येथे पावनगडसंबंधीची माहिती समजावी म्हणूनही प्रयत्न सुरू आहेत.यावेळी बॅनर लावून जनजागृतीचे संदेश देणे, किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटक तसेच हुल्लडबाजी करणाºयांना सूचना देणे, पोलिसांच्या मदतीने पार्ट्या करणाºयांवर नियंत्रण आणणे अशीही मोहीम हे शिवप्रेमी राबवीत आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रतिकृती
यंदाच्या वर्षीही दुचाकीच्या दर्शनी भागावर किल्ल्याची सुंदर आकर्षक प्रतिकृती तयार करून हँडेलवर शिवरायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून ही दुचाकी संपूर्ण जिल्ह्यातून फेरफटका मारत आहे. यावेळी त्यांनी दुचाकीवर किल्ले संवर्धन करूया असे संदेश देताना पूर्वीचे गड, आताचे गड व नंतरचा गड असा प्रतीकात्मक किल्ला लावला आहे. गाडीच्या मागे डौलाने भगवा फडकविला जात आहे .गेल्यावर्षीही प्रतापगडची प्रतिकृती यातील एका सदस्याने तयार करून संपूर्ण शहरभर फेरफटका मारला होता.
प्रसिद्धीपासून दूर राहत शिवनिष्ठा ग्रुपने ने आपली मोहीम सातत्यपूर्ण सुरु ठेवली आहे. केवळ शिवरायांच्या प्रेमापोटी व त्यांनी किल्ल्यांच्या माध्यमातून दिलेला मोठा ठेवा जपला जावा, त्याची जागृती व्हावी हाच त्यांचा उद्देश असून यासाठीच ध्येयवेडे होऊन कर्तव्य पार पाडण्याचा छोटासा प्रयत्न करीत असल्याचे त्यांचे सदस्य नामोल्लेख न करता सांगतात. केवळ शिवनिष्ठा ग्रुप यातच सर्व काही आहे असेही ते अभिमानाने सांगतात. ज्यांना या मोहिमेत सहभागी व्हायचे असेल त्यांनाही यामध्ये सामावून घेऊ असेही त्यांनी आवाहन केले आहे.