मनीमाऊंचे नखरे बघण्यासाठी कोल्हापूरकरांची गर्दी, बैंगाल कॅट लक्षवेधी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 03:08 PM2023-12-04T15:08:20+5:302023-12-04T15:08:42+5:30

कोल्हापूर : देशविदेशांतील मऊ मऊ मांजरांच्या अदा, नखरे आणि त्यांच्यात रंगलेल्या स्पर्धा, प्रदर्शन पाहण्यासाठी रविवारी दहा हजारांहून अधिक आबालवृद्धांनी ...

Unique Cat Shows in Kolhapur, Including more than three hundred cats like Saberian, Persian, Indi Mau, Bengal Tiger | मनीमाऊंचे नखरे बघण्यासाठी कोल्हापूरकरांची गर्दी, बैंगाल कॅट लक्षवेधी

छाया-नसीर अत्तार

कोल्हापूर : देशविदेशांतील मऊ मऊ मांजरांच्या अदा, नखरे आणि त्यांच्यात रंगलेल्या स्पर्धा, प्रदर्शन पाहण्यासाठी रविवारी दहा हजारांहून अधिक आबालवृद्धांनी गर्दी केली. फिलाईन क्लब ऑफ इंडियाच्यावतीने रविवारी महासैनिक दरबार हाॅल येथे अनोख्या कॅट शो आयोजित केला होता. त्यात सॅबेरियन, पार्शियन, इंडी माऊ, बैंगाल टायगर अशा तीनशेहून अधिक मांजरांच्या पिंजऱ्यात राहूनही अदा पाहण्यासारख्या होत्या.

गेल्या पाच वर्षे हा खास मांजरांसाठी निर्माण झालेल्या क्लबच्यावतीने खास देशविदेशांतील मांजरांचे अर्थात कॅट शो चे आयोजन केले जात आहे. यात कोरोनाचा दोन वर्षांचा अपवाद वगळता या क्लबने देशी इंडीमाऊसह परदेशातील विविध जातीची आणि वीस ते पाच लाखांपर्यंतच्या मांजरांचे प्रदर्शन कोल्हापूर नगरीत भरविले आहे. पाच वर्षात तीन वेळा झालेल्या प्रदर्शनाला अगदी दोन वर्षाच्या बालकांपासून ते नव्वदीतील आजोबा-आजींच्यापर्यंतची मंडळी हा अनोखा मांजरांचा शो पाहण्यासाठी आवर्जून हजेरी लावत आहेत. सहभागी होणारी मंडळी तर कोल्हापूरसह बंगळूरू, बेळगाव, सोलापूर, मुंबई, पूणे, सातारा, सांगली आदी ठिकाणाहून सहभागी झाली होती.

यावेळी मांजरांची निगा, त्यांचे आरोग्य, लसीकरण, आहाराची या कॅट शोमध्ये माहिती देण्यात आली. विद्यार्थ्याकरीता प्राण्यांमध्ये गोडवा निर्माण करण्यासाठी चाळीस हजार मोफत पासेस क्लबने वाटले होते. त्यामुळे दिवसभरात या शोच्या ठिकाणी लहानग्यांसह पालक मंडळींच्या रांगाच रांगा असे चित्र होते.

लहानग्यांच्या उत्साह तर ओसांडून वाहणारा होता. स्वयंसेवकांची सर्वांना आवर घालताना तर चांगलीच दमछाक झाली. विशेषत : बेंगॉल कॅट अर्थात चित्यासारखे दिसणारे मांजर पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. क्लासिक लाँग हेअर, बँगाल कॅट, मेनकुन, ब्रिटिश शॉर्ट हेअर, एक्झाटिक शॉर्ट कॅट, सॅबेरियन कॅट, सियामिस, ओरिवो, भारतीय जातीचे इंडी माऊ अशा विविध प्रजातींच्या मांजराचा यात समावेश होता.

भारतीय आणि विदेशी असे दोन भागात मांजराच्या प्रजातीनिहाय निकषांवर ही स्पर्धा घेण्यात आली. या मांजरांचे मूल्यमापन करण्यासाठी मलेशियाहून सेन अब्दूल, ऑस्ट्रेलियाहून मायकल वूडस, भारतीय तज्ज्ञ साकीब पठाण यांनी परीक्षण केले. शो यशस्वी होण्यासाठी मोहम्मद राजगोळे, दिगंबर खोत, अखिल तांबोळी, मुकुंद भेंडिगिरी, दस्तगीर शिकलगार, शुभम कोतमिरे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Unique Cat Shows in Kolhapur, Including more than three hundred cats like Saberian, Persian, Indi Mau, Bengal Tiger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.