एड्स जनजागृतीसाठी अनोखी ऑनलाईन स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:39 AM2020-12-12T04:39:06+5:302020-12-12T04:39:06+5:30
व्हिडिओ, मिम्स, जीआयएफ पाठविण्याचे आवाहन कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक आणि छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयामार्फत ...
व्हिडिओ, मिम्स, जीआयएफ पाठविण्याचे आवाहन
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक आणि छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयामार्फत एड्स जनजागृतीसाठी एका अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले असून व्हिडिओ, मिम्स आणि जीआयएफच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑनलाईन घेण्यात येणार आहे.
एड्ससंदर्भात जागतिक एकता, सामायिक जबाबदारी या संकल्पनेवर आधारित ही जनजागृतीपर ऑनलाईन स्पर्धा असून व्हिडिओ, मिम्स आणि जीआयएफच्या माध्यमातून या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन समन्वयक दीपा शिपूरकर यांनी केले आहे.
स्वत:ची एचआयव्ही स्थिती जाणून घेण्याची गरज, आईकडून बालकाला होणारा एचआयव्ही/एड्स संसर्ग प्रतिबंध आणि एचआयव्ही/एड्स आणि कलंक भेदभाव हे या स्पर्धेचे विषय असून स्पर्धकाने सोशल मीडियाकरिता एक मिनिटाचा एचआयव्हीएड्स जनजागृतीपर संदेश देणारा एकच व्हिडिओ ९३७१६५२०६९ या क्रमांकावर, मिम्स ९८२२४५८६१४ या क्रमांकावर, तर जीआयएफ ९६६५८८३५५३ या संपर्क क्रमांकावर पाठवण्याचे आवाहन शिपूरकर यांनी केले आहे.
एक स्पर्धक तीनही स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकणार असून हे साहित्य दि १८ डिसेंबर २०२० पर्यंत आपल्या नावासहीत पाठवावेत. विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देण्यात येणार आहे.
(संदीप आडनाईक)