विषयच हार्ड! कोल्हापूरच्या तरुणाने प्रपोजसाठी लावला हायवेवर डिजिटल बोर्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 07:26 PM2022-05-19T19:26:16+5:302022-05-19T20:31:31+5:30
या अनोख्या पद्धतीने प्रपोज केल्यानंतर मुलगी सुद्धा लग्नासाठी तयार झाली आणि या होर्डिंग समोर येऊन दोघांनी एकत्र फोटो सुद्धा काढला
सुरज पाटील
हेरले : विवाह म्हटलं की मुलीला बघायला जाणे, कांदे-पोह्याचा कार्यक्रम, मुलगी पसंत पडली तर पुढील रितीरिवाजाप्रमाणे बोलणी यासर्व पारंपारिक गोष्टी आल्याच. मात्र सध्याच्या आधुनिक जगात आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रेमवीर अनेक नामी शक्कल लढवत असतात. अशीच काहीशी आगळी-वेगळी शक्कल कोल्हापुरातील एका तरुणाने लढवली आहे. या तरुणाने एका मुलीला लग्नासाठीच प्रपोज केलाय अन् तो जिल्ह्यात तसेच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय.
कोल्हापुरातील इंजिनीयर असणाऱ्या तरुणाने लग्नासाठी मुलीला चक्क डिजिटल होर्डिंग द्वारेच प्रपोज केला आहे. सौरभ कसबेकर असे या तरुणाचे नाव आहे. सौरभने कोल्हापूर-सांगली महामार्गावर चोकाक येथे होर्डिंग वर 'उत्कर्षा मॅरी मी - सौरभ' एवढेच लिहून अनोख्या पद्धतीने प्रपोज केलं. या होर्डिंगची जिल्ह्यात सर्वत्र चर्चा रंगली आहे.
घरचे म्हणाले कोणी असेल तर सांग
सौरभ कसबेकर आणि सांगलीमधील मुलगी उत्कर्षा दोघेही बुधगाव-सांगली येथील वसंतरावदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सिव्हिल डिपार्टमेंटमध्ये शिक्षण घेत होते. सौरभची आणि उत्कर्षाची शेवटच्या वर्षापर्यंत सुद्धा काही खास ओळख नव्हती. शिक्षण पुर्ण होताच घरच्यांनी सौरभकडं लग्नाबाबत विचारणी केली. घरचे म्हणाले कोणी असेल तर सांग आम्ही रीतसर मागणी घालू असे म्हणताच त्याने तात्काळ आमच्या कॉलेजमधील उत्कर्षा नावाची मुलगी आहे असे सांगितले. घरच्यांनी रीतसर तिच्या घरी लग्नासाठी मागणी घालायचे ठरवले. त्यानुसार सौरभच्या वडिलांनी उत्कर्षाच्या घरी मागणी घातली.
..अखेर उत्कर्षाकडून होकार
उत्कर्षाच्या घरच्यांचे सुद्धा काही दिवस होय नाही होय नाही हेच सुरू होते. उत्कर्षाकडून सुद्धा अध्याप होकार आला नव्हता. अनेक प्रयत्नानंतर अखेर घरचे सुद्धा तयार झाले. मात्र लग्नासाठी अनोख्या पद्धतीने तिला प्रपोज करायचे असे सौरभने ठरवले होते. त्यानुसार त्याने कोल्हापूर-सांगली रोड वर एका होर्डिंगद्वारे प्रपोज करायचे ठरवले. कोल्हापूर-सांगली महामार्गावर चोकाक येथे होर्डिंग वर 'उत्कर्षा मॅरी मी - सौरभ' एवढेच लिहून त्याने अनोख्या पद्धतीने प्रपोज केले.
अनोख्या लव्ह स्टोरीची जिल्ह्यात चर्चा
या अनोख्या पद्धतीने प्रपोज केल्यानंतर मुलगी सुद्धा लग्नासाठी तयार झाली आणि या होर्डिंग समोर येऊन दोघांनी एकत्र फोटो सुद्धा काढला. या अनोख्या लव्ह स्टोरीची संपूर्ण जिल्ह्यात एकच चर्चा सुरू आहे.२७ मे रोजी लग्न - दरम्यान, दोघांच्याही घरचे तयार झाले आहेत. शिवाय येत्या २७ मे रोजी दोघांचे लग्न सुद्धा ठरवले आहे. त्यामुळे आम्ही दोघेही आनंदी असून आगळ्या वेगळ्या प्रकारे प्रपोज करून लग्न होत असल्याचा शिवाय कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यात याची चर्चा सुरू असल्याचाही आनंद होत असल्याचे दोघांनी सांगितले.