अनोखा जागतिक संगीत दिन : कोल्हापुरात २४ तासांत १२ मैफली, १२० गायकांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 05:49 PM2019-06-21T17:49:08+5:302019-06-21T17:56:45+5:30
गाण्यांच्या मैफिलीतून गरजूंच्या मदतीसाठी गेली १८ वर्षे सातत्याने आर्थिक मदतीचा हात देणाऱ्या प्रतिज्ञा नाट्यरंगने शुक्रवारी २४ तासात १२ मैफिली सादर करून अनोख्या पद्धतीने ‘जागतिक संगीत दिन’ साजरा केला. कॅन्सरग्रस्त कॅन्सरग्रस्त हबीबभाईंच्या आनंदासाठी आयोजित या उपक्रमात १२० गायक आणि गायिकांनीही आपले योगदान दिले. शिवाय या मैफिलीत ऐच्छिक मूल्यातून जमा झालेली रक्कमही गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुपूर्द केली आहे.
संदीप आडनाईक
कोल्हापूर : गाण्यांच्या मैफिलीतून गरजूंच्या मदतीसाठी गेली १८ वर्षे सातत्याने आर्थिक मदतीचा हात देणाऱ्या प्रतिज्ञा नाट्यरंगने शुक्रवारी २४ तासात १२ मैफिली सादर करून अनोख्या पद्धतीने ‘जागतिक संगीत दिन’ साजरा केला. कॅन्सरग्रस्त कॅन्सरग्रस्त हबीबभाईंच्या आनंदासाठी आयोजित या उपक्रमात १२० गायक आणि गायिकांनीही आपले योगदान दिले. शिवाय या मैफिलीत ऐच्छिक मूल्यातून जमा झालेली रक्कमही गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुपूर्द केली आहे.
‘ना नफ्यासाठी, ना स्वार्थासाठी, आमची मैफिल गरजवंतांच्या आधारासाठी’ हे ब्रीदवाक्य असलेल्या ‘प्रतिज्ञा नाट्यरंग’ने शुक्रवारी ‘जागतिक संगीत दिना’चे औचित्य साधून गुरुवार (दि. २०)च्या मध्यरात्रीपासून शुक्रवारच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत २४ तासांत सलग १२ हिंदी चित्रपटगीतांच्या मैफिली सादर केल्या. उद्यमनगर येथील रामभाई सामाणी स्मृती सभागृहात झालेल्या या मैफिलीत १२० गायक-गायिकांनी योगदान दिले.
सुहानी रात ढल चुकी, सूरमयी आॅँखिंयों में, ओल्ड इज गोल्ड, भोर भये पनघट पे, तुम्हे याद होगा, दिवाना हुआ बादल, गुनगुना रहे हैं भवर, छुकर मेरे मन को, संगीत आरोग्यम, दिल ने फिर याद किया, सुनहरे पल आणि रात का समा या मैफिली या २४ तासांत कराओके ट्रॅकवर सादर झाल्या. जयश्री देसाई, किरण रणदिवे यांनी निवेदन केले. रमेश सुतार यांनी ध्वनिसंयोजन केले. आज या संस्थेचा ९५ वा प्रयोग होता. ३६५ दिवसांत ३६५ मैफिली सादर करण्याचा संस्थेचा संकल्प आहे.
कॅन्सरग्रस्त हबीबभाईना मिळाला अत्यानंद
कॅन्सरग्रस्त असलेले हबीबभाई सोलापुरे यांना गायनातून आनंद मिळावा, हे या मैफिली आयोजित करण्याचे आणखी एक कारण होते. हबीबभाई स्वत: गायक आहेत. त्यांनीही या मैफिलीत गाणे गाइले आहे.
गरजू विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी मदत सुपूर्द
या २४ तासांत झालेल्या सर्व मैफिलींतून जमा झालेली रक्कम वि. स. खांडेकर प्रशालेतील १३ गरजू विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी शाळेच्या पर्यवेक्षक नेहा कानकेकर आणि भरत अलगौडर यांच्याकडे ‘प्रतिज्ञा’तर्फे सुपूर्द करण्यात आली.
२४ तासांत १२0 गायक-गायिकांचा सहभाग
या मैफिलीत हबिब सोलापुरे, प्रेषित शेडगे, आनंद पाटील, प्रवीण लिंबड, स्नेहलता सातपुते, संजय चौगुले, शेखर आयरेकर, अरविंद कस्तुरे, संजय शेटके, शिवलाल पाटील, राजेश भुते, सुहास पोतनीस, विजय लांबोरे, मोहन घाडगे, अंजली दुर्गाई, मनोज सोरण, पूजा पवार, सरदार पाटील, पूजा रणदिवे, डॉ. भट, राजश्री सूर्यवंशी, शेखर मोरे, राजेंद्र भंडारे, सतीश कवाळे, सागर कांबळे, राजेंद्र कोरे, राजेंद्र कल्याणकर, अजित आजरी, बसिर मोमीन या गायक-गायिकांचा सहभाग होता.
प्रतिज्ञाचा मदतीचा अखंड वसा
कोल्हापुरातील प्रशांत जोशी यांनी २000 मध्ये सुरू केलेल्या ‘प्रतिज्ञा नाट्यरंग’ या संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित कलेच्या माध्यमातून मानवता हे ध्येय ठेवून गरजूंसाठी आर्थिक मदत जमा केली आहे. गायन असो, राज्यनाट्य स्पर्धा असो, नृत्याचे कार्यक्रम असोत, की अंबाबाईच्या नवरात्रीतील अखंड संगीत सेवा असो, ऐच्छिक मूल्य स्वीकारत त्यात स्वत:च्या आणि दानशूरांनी दिलेल्या रकमेची भर टाकत ती योग्य आणि गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा वसा जोशी यांनी अखंडपणे सुरू ठेवला आहे. केवळ नवरात्रौत्सवात २७ महिलांना तर गेल्या १८ वर्षांत प्रतिज्ञा नाट्यरंगने ३२५ गरजूंना १० लाखांचे अर्थसाहाय्य केले आहे.