मास मेडिटेशनचा अनोखा विश्वविक्रम

By admin | Published: February 25, 2016 01:01 AM2016-02-25T01:01:36+5:302016-02-25T01:42:02+5:30

गांधी मैदानावर उपक्रम : ‘ब्रह्माकुमारी’ संस्थेकडून आयोजन; एशिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद

Unique World Record of Mass Meditation | मास मेडिटेशनचा अनोखा विश्वविक्रम

मास मेडिटेशनचा अनोखा विश्वविक्रम

Next

कोल्हापूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत मन:शांतीद्वारे विश्वशांती व समृद्धीसाठी येथील गांधी मैदानावर सुमारे वीस मिनिटे विश्वविक्रमी मास मेडिटेशन उपक्रम करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये सुमारे २६ हजारांहून अधिक बंधू-भगिनींनी एकत्र येऊन हा मास मेडिटेशन कार्यक्रम केल्याने या विक्रमाची नोंद ‘एशिया बुक आॅफ रेकॉर्ड’मध्ये झाल्याची घोषणा करण्यात आली. प्रजापिता ब्रह्माकुमारीय ईश्वरीय विश्वविद्यालय कोल्हापूरच्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त हा विश्वविक्रमी उपक्रम झाला. ब्रह्माकुमारीज (माऊंट अबू)च्या संयुक्त सहप्रशासिका डॉ. दादी रतनमोहिनीजी व बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील हे यावेळी प्रमुख उपस्थित होते.
गांधी मैदानावर हा मास मेडिटेशन उपक्रम झाला. यासाठी उपस्थित २६ हजार ४३६ बंधू-भगिनींना महाराष्ट्र व आंध्रप्रदेशच्या क्षेत्रीय संचालिका संतोष दादीजी यांनी सुमारे २० मिनिटे ध्यानाची सामुदायिक आज्ञा दिली. त्यानंतर ‘एशिया बुक आॅफ रेकॉर्ड’चे मोहन जोशी यांनी विक्रमाची अधिकृत घोषणा केली.
या विश्वविक्रमी उपक्रमासाठी सायंकाळी पाच वाजल्यानंतर गांधी मैदान भरण्यास प्रारंभ झाला. सायंकाळी सवाद्य शोभायात्रेतून संयुक्त सहप्रशासिका डॉ. दादी रतनमोहिनीजी यांचे आगमन झाले. सांस्कृतिक कार्यक्रमानंतर डॉ. दादी रतनमोहिनीजी, डॉ. डी. वाय. पाटील, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. यावेळी सोनाली यांनी स्वागतनृत्य केले. संयोगीता पाटील ग्रुपच्यावतीने नृत्य कार्यक्रम झाला.
प्रमुख वक्त्या संतोषदीदीजी म्हणाल्या, मानवात भेदभाव वाढत आहे प्रेम कमी होत आहे, मनुष्य आज स्वत:ला विसरत चालला आहे. त्यामुळे मनुष्याने मन, बुद्धी, संस्कारांचा राजा बनण्यासाठी राजयोगाद्वारे सुख-शांतीमय तणावमुक्त आनंदी जीवनाचा वारसा अवलंबला पाहिजे, असे उद्गार काढले. त्यानंतर त्यांनी उपस्थित बंधू-भगिनींना सुमारे वीस मिनिटे ध्यानाची सामुदायिक आज्ञा दिल्यानंतर खचाखच भरलेल्या मैदानातही नीरव शांतता पसरली होती. त्यानंतर ‘एशिया बुक आॅफ रेकॉर्ड’मध्ये विक्रमाची नोंद झाल्याची घोषणा मोहन जोशी यांनी केली. या घोषणेचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. यावेळी ‘एशिया बुक रेकॉर्ड’मध्ये नोंद झाल्याचे प्रमाणपत्र डॉ. डी. वाय. पाटील, मोहन जोशी यांच्यावतीने देण्यात आले. यावेळी मनोरमा दीदीजी यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Unique World Record of Mass Meditation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.