चुकीच्या बिलाची ‘युनिटी’ची कबुली
By Admin | Published: May 23, 2017 12:56 AM2017-05-23T00:56:04+5:302017-05-23T00:56:04+5:30
आयुक्तांकडे खुलासा : पालकमंत्र्यांना लवकरात लवकर अहवाल देणारलोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेअंतर्गत ठिकपुर्ली येथे उभारण्यात आलेल्या लोखंडी पुलाचे बिल चुकीच्या गृहितकांवर दिल्याचे योजनेची सल्लागार कंपनी असलेल्या युनिटी कन्सल्टंटने आयुक्त अभिजित चौधरी यांच्याकडे दिलेल्या खुलासापत्रात मान्य केले आहे. योजनेशी संबंधित अधिकाऱ्यांकडून याबाबत खुलासा येताच आपण स्वत: पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना लवकरात लवकर अहवाल देऊ, असे आयुक्त चौधरी यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
थेट पाईपलाईन योजनेतील ठिकपुर्लीजवळील उभारलेल्या लोखंडी ब्रीजमध्ये भ्रष्टाचार झाला असून, त्याची चुकीची बिले दिल्याचा आरोप महानगरपालिकेतील भाजप-ताराराणी आघाडीतर्फे करण्यात आल्यानंतर योजना वादात सापडली. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी याप्रकरणी आयुक्त चौधरी यांना चौकशी करून अहवाल देण्याची सूचना केली होती. त्यानुसार आयुक्तांनी योजनेचे सल्लागार युनिटी कन्सल्टंट, मनपाचे उपायुक्त विजय खोराटे, प्रभारी जलअभियंता सुरेश कुलकर्णी, मुख्य लेखापरीक्षक धनंजय आंधळे यांना नोटीस बजावून त्यांच्याकडून लेखी खुलासा मागितला होता.
युनिटी कन्सल्टंटने प्रभारी जलअभियंता कुलकर्णी यांच्याकडे खुलासा सादर केला. त्यांनी तो सोमवारी आयुक्त चौधरी यांच्याकडे सादर केला. या खुलासापत्रात चुकीच्या पद्धतीने ठेकेदाराचे बिल अदा करण्यात आल्याचे मान्य करण्यात आले आहे. प्रत्यक्षात २५ लाख रुपयांचेच काम झाले असले तरी मूळ आराखड्यात लमसम दोन कोटी ४८ लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्यामुळे त्या पद्धतीने बिल देण्याची शिफारस करण्यात आली. या ब्रीजच्या कामापोटी ठेकेदारास एक कोटी ३९ लाख रुपये अदा केले आहेत. मात्र, अदा केलेली रक्कम पुढील बिलातून वळती करता येते. त्यामुळे या घटकेला महानगरपालिकेचे काही नुकसान झालेले नाही किंवा होणारही नाही, असे खुलासापत्रात नमूद केले आहे.
याबाबत आयुक्तांनी सांगितले की, युनिटीचा खुलासा मिळाला असला तरी अद्याप मनपाच्या चार अधिकाऱ्यांकडून खुलासा आलेला नाही. तो येताच पालकमंत्र्यांना यासंबंधीचा अहवाल देणार आहे. एका कामात चूक झाल्यामुळे आता पुढील पाच पूल बांधताना जरी त्याच्या खर्चाची तरतूद लमसम धरली असली तरी कामाचे मूल्यमापन करूनच त्याचे बिल दिले जाईल.