आरक्षण प्रक्रिया चुकीची झाल्याची सार्वत्रिक तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:20 AM2020-12-23T04:20:07+5:302020-12-23T04:20:07+5:30

कोल्हापूर : महानगरपालिकेची प्रारुप प्रभाग रचना व आरक्षण प्रक्रिया चुकीच्या पध्दतीने राबविल्याची सार्वत्रिक तक्रार होत आहेे. त्यामुळे ही प्रक्रिया ...

Universal complaint that the reservation process went wrong | आरक्षण प्रक्रिया चुकीची झाल्याची सार्वत्रिक तक्रार

आरक्षण प्रक्रिया चुकीची झाल्याची सार्वत्रिक तक्रार

Next

कोल्हापूर : महानगरपालिकेची प्रारुप प्रभाग रचना व आरक्षण प्रक्रिया चुकीच्या पध्दतीने राबविल्याची सार्वत्रिक तक्रार होत आहेे. त्यामुळे ही प्रक्रिया वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. सोमवारी नागरिकांकडून अनेक प्रश्न विचारण्यात आले, परंतु अधिकाऱ्यांनी त्याची उत्तरे देण्याचे टाळले. मंगळवारी भारतीय जनता पक्षाच्या एका शिष्टमंडळाने प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची भेट घेऊन झालेल्या सर्व प्रक्रियेची लेखी माहिती देण्याची मागणी केली.

भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, अजित ठाणेकर, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, आशिष कपडेकर यांनी प्रशासक बलकवडे यांची भेट घेऊन चुकीची पद्धत राबविली गेली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. लेखी माहितीची मागणी त्यांनी केली.

सोमवारी येथील केशवराव भोसले नाट्यगृहात झालेल्या प्रारुप प्रभाग रचना सादरीकरण व प्रभाग आरक्षण सोडत यावर अनेक शंका घेत प्रश्नांचा भडिमार करण्यात आला होता. पण ही आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडल्यानंतर तुम्ही हरकती घ्या, आम्ही सुनावणी घेऊन त्यावर मार्ग काढू अशा पध्दतीने उत्तरे देऊन अधिकाऱ्यांनी चर्चा टाळली होती. परंतु उपस्थित असलेल्या नागरिकांचे त्यामुळे समाधान झालेले नाही.

प्रारुप प्रभाग रचना करताना २०११ ची लोकसंख्या गृहित धरण्यात आली असल्याचे सांगितले. तसे असेल तर लोकसंख्या वाढण्याचे काहीच कारण नाही आणि प्रभाग रचनेचे प्रारुप तयार करताना प्रगणक गट बदलण्याचेही काही कारण नव्हते. एक प्रगणक गट साधारण ५०० ते ५५० लोकसंख्येचा असतो. प्रारुप तयार करताना प्रगणक गट फोडता येत नाहीत असे सांगितले गेले. तसेच फार मोठी प्रभाग रचना बदललेली नाही असेही सांगितले गेले. परंतु एक प्रगणक गट बदलला तर २०० ते २२५ मतांचा फरक पडतो. त्यामुळे करण्यात आलेले बदल महापालिकेच्या दृष्टीने मोठेच आहेत.

सोमवारी उलट सुलट प्रश्नांची सरबती सुरू झाल्यावर अधिकाऱ्यांकडून विसंगत उत्तरे यायला लागली. प्रारुप प्रभाग रचना करत असताना मधले प्रभाग फोडता येत नाहीत असे काही जाणकारांनी लक्षात आणून देताच उपायुक्त निखिल मोरे यांनी सर्व प्रभागात बदल करण्यात आल्याचे सांगितले. प्रशासक बलकवडे यांनी तसे झाले नाही म्हणून सांगितले.

अनुसुचित जातीचे आरक्षण निश्चित करताना लोकसंख्येची अट ग्राह्य मानली जाते याकडे लक्ष वेधले असताना राज्य निवडणुक आयोगाचे उपायुक्त अविनाश सनस यांनी लोकसंख्या नाही तर त्याची टक्केवारी विचारात घेतली जाते असे सांगितले. कोणत्या प्रभागात बदल केले आहेत अशी विचारणा केली तेंव्हा एकाही अधिकाऱ्यांने माहिती दिली नाही. प्रभागाचे सादरीकरण करण्यात आले आहे, ते पाहून तुम्हीच उत्तर शोधा असा पर्याय अधिकाऱ्यांनी सांगितला. त्यामुळे नागरीकांच्या मनात शंकाचे काहूर अधिकच निर्माण झाले.

प्रभाग कसे तयार केले?

- शहराची लोकसंख्या पाच लाख ४९ हजार २३६

- या लोकसंख्येला ८१ प्रभागाने भागले

- तेंव्हा एका प्रभागाची लोकसंख्या सरासरी ६७८१ इतकी आली.

- प्रभाग लोकसंख्या निश्चित झाल्यावर १० टक्के कमी जास्त करण्याची मुभा.

Web Title: Universal complaint that the reservation process went wrong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.