विद्यापीठांनी विद्यार्थी उद्योजकतेला प्रोत्साहन देणारे वातावरण जोपासावे - डॉ.एस.एस. मंथा
By पोपट केशव पवार | Published: December 18, 2023 04:04 PM2023-12-18T16:04:22+5:302023-12-18T16:05:18+5:30
शिवाजी विद्यापीठाचा ६० वा दीक्षांत समारंभ उत्साहात
पोपट पवार
कोल्हापूर : ज्या विद्यापीठातील विद्यार्थी त्याचे स्टार्टअप्स यशस्वी करतात, ती विद्यापीठे नाविन्यपूर्ण आणि व्यावहारिक कौशल्य विकासाला चालना देतात असे समाजात मानले जाते. त्यामुळे विद्यापीठांनी सक्रियपणे विद्यार्थी उद्योजकतेला समर्थन देणारे वातावरण जोपासले पाहिजे, असा कानमंत्र अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष, महाप्रित स्टार्टअप सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एस.एस. मंथा यांनी सोमवारी दिला.
शिवाजी विद्यापीठाचा ६० वा दीक्षांत समारंभ विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मंथा बोलत होते. कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के अध्यक्षस्थानी होते. डॉ. मंथा म्हणाले, आयुष्यात मोठे ध्येय ठेवा. मोठे स्वप्न पहा. यश आणि अपयश हा आपल्या प्रवासाचा भाग आहे. त्यामुळे दोघांनाही स्वीकारायची मनाची तयारी ठेवा. विद्यापीठांनी सक्रियपणे विद्यार्थी उद्योजकतेला समर्थन देणारे वातावरण जोपासले पाहिजे. यामध्ये इनक्यूबेटर, फंडिंगची सोय आणि मेंटोरशीपचे कार्यक्रम यांचा समावेश असायला हवा.
कुलगुरु डॉ. शिर्के म्हणाले, नवे जग वेगवान व स्पर्धेचे आहे, ही स्पर्धा जिंकण्यासाठी विद्यार्थ्यांना पदवीबरोबरच नवे तंत्र कोशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे. प्रत्येकाचा शैक्षणिक प्रवास सारखा नसतो. अनेकांना अडथळे, संघर्ष करून इथेपर्यंत पोहचावे लागले. त्यामुळे या यशाला वेगळी किनार आहे. दीक्षान्त समारंभामध्ये व्यासपीठावर १६ स्नातकांना पारितोषिके आणि ४० विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी वितरित करण्यात आली.