विद्यापीठांनी रोजगार देणारे शिक्षण द्यावे :पी. पी. पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 11:12 PM2018-11-18T23:12:42+5:302018-11-18T23:12:47+5:30
कोल्हापूर : केवळ पदवीधर निर्माण करण्यापेक्षा निश्चित रोजगाराची हमी देणारे शिक्षण देण्याची जबाबदारी विद्यापीठांनी घ्यावी. संशोधन हा विद्यापीठाचा मूलभूत ...
कोल्हापूर : केवळ पदवीधर निर्माण करण्यापेक्षा निश्चित रोजगाराची हमी देणारे शिक्षण देण्याची जबाबदारी विद्यापीठांनी घ्यावी. संशोधन हा विद्यापीठाचा मूलभूत पाया आहे. कल्पकता, कठोर परिश्रम यांच्या बळावर नवसंशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. पी. पी. पाटील यांनी रविवारी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या ५६व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, उच्च शिक्षणामध्ये गतीने बदल होत आहेत. अनेक प्रकारची प्रतिकूल आव्हाने प्रादेशिक विद्यापीठांसमोर आहेत. जागतिक स्पर्धेत आपले विद्यार्थी कसे टिकतील, याचा विचार विद्यापीठांनी करणे आवश्यक आहे. विद्यापीठाने आता समाजाकडे जावे. त्या दृष्टीने पारंपरिक शिक्षणपद्धती, धोरणात्मक बदल करावेत. नव्या बदलांना सामोरे जाण्यास सज्ज व्हावे. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतचा विशेष संग्रह
शिवाजी विद्यापीठाच्या बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्रातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतच्या विविध स्वरूपांतील उपलब्ध आॅनलाईन स्रोतांचे एकत्रित संकलन केले आहे. त्याचे विशेष वेब-पेज विद्यापीठाच्या संकेतस्थळावर तयार केले आहे. त्यामध्ये १४२ ई-बुक्स, आॅडिओ बुक्स, विकिपीडियावरील लिंक्स, चित्रपट आणि पीएच. डी. शोधप्रबंध आहेत. संबंधित वेब-पेजचे या कार्यक्रमात उद्घाटन झाले.