विद्यापीठाने स्वीकारले १५५ गावांचे पालकत्व
By admin | Published: July 18, 2016 01:05 AM2016-07-18T01:05:20+5:302016-07-18T01:09:38+5:30
‘मुनिजन’ योजनेअंतर्गत करणार विकास
संतोष मिठारी / कोल्हापूर
विविध विद्याशाखांद्वारे शिक्षण देणाऱ्या शिवाजी विद्यापीठाने कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील १५५ गावांचे पालकत्व स्वीकारत सामाजिक बांधीलकीचे पाऊल टाकले आहे. विद्यापीठाने ‘मुनिजन’ (महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज न्यू इनिशिएटीव्हज जॉइंट अॅक्शन नाऊ) योजनेअंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) माध्यमातून लोकसहभागातून विकास साधण्यासाठी संंबंधित गावे दत्तक घेतली आहेत. विद्यापीठाने महाविद्यालयांच्या मदतीने श्रमदानातून या गावांमध्ये बंधाऱ्यांची उभारणी, वृक्षारोपणाची कामे पूर्ण केली आहेत.
विद्यापीठाने कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील एनएसएस संलग्नित प्रत्येक महाविद्यालयाच्या माध्यमातून एक गाव पाच वर्षांसाठी दत्तक घेतले आहे. संबंधित महाविद्यालयांच्या माध्यमातून दत्तक घेतलेल्या या गावांमध्ये लोकसहभागातून विकास साधला जाणार आहे. त्यासह श्रमदानातून या गावांच्या शाश्वत विकासासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. ‘मुनिजन’ योजनेअंतर्गत दत्तक घेतलेल्या १५५ गावांमध्ये विद्यापीठाने जानेवारी २०१६ पासून कामाला सुरुवात केली. याठिकाणी ‘एनएसएस’च्या निवासी विशेष श्रमसंस्कार शिबिरातून जलसंधारणासाठी एकूण २० बंधाऱ्यांच्या उभारणी केली आहे. त्यासह वृक्षारोपण, ग्रामस्वच्छता, पशुवैद्यकीय चिकित्सा, पाणी आणि मातीपरीक्षण केले आहे. तसेच सौरऊर्जेचा वापर, अंधश्रद्धा निर्मूलन, जलसंवर्धनाबाबत प्रबोधनाचे उपक्रम राबविले आहेत. श्रमदानासह प्रबोधनात्मक उपक्रमांसाठी गेल्या सहा महिन्यांत ‘एनएसएस’च्या १२ हजार स्वयंसेवकांनी काम केले आहे. विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयांच्या माध्यमातून दत्तक घेतलेल्या गावांच्या विकासाचा प्राथमिक आराखडे तयार केले आहेत. यामध्ये संबंधित गावांमधील शिक्षण, आरोग्य, पाणी उपलब्धता, पायाभूत सुविधा, आदींच्या नियोजनाचा समावेश आहे. यासाठी ‘एनएसएस’च्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून सर्व्हेक्षण केले आहे. हे आराखडे मान्यतेसह पुढील कार्यवाहीसाठी शासनाला सादर केले आहेत.
स्वयंपूर्ण गाव साकारणार
‘मुनिजन’ योजनेअंतर्गत ‘एनएसएस’च्या माध्यमातून संबंधित गावे स्वयंपूर्ण, परिपूर्ण केली जाणार आहेत. शासनाच्या सूचनांनुसार विद्यापीठाने दत्तक घेतलेल्या गावांचा विकास साधला जाणार असल्याचे विद्यापीठाचे ‘एनएसएस’चे समन्वयक डॉ. डी. के. गायकवाड यांनी सांगितले. ते म्हणाले, या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधीलकीची मूल्ये रुजविण्याचा विद्यापीठाचा उद्देशही सफल होईल. वर्षभरात महाविद्यालयांतील ‘एनएसएस’च्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून गावांचे सर्वेक्षण करून प्राथमिक आराखडा बनविला आहे.
जिल्हानिहाय दत्तक गावे
62
कोल्हापूर
48
सांगली
45
सातारा