राष्ट्रभाषेच्या परीक्षांना विद्यापीठस्तराचा दर्जा
By admin | Published: September 14, 2014 12:34 AM2014-09-14T00:34:39+5:302014-09-14T00:35:07+5:30
केंद्र शासनाचा निर्णय : पदोन्नती, नोकरी करत शिक्षण घेणाऱ्यांना सुवर्णसंधी
प्रकाश मुंज / कोल्हापूर
हिंदी भाषेच्या प्रचार आणि प्रसाराचे काम करणाऱ्या पुण्यातील महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेच्या परीक्षा आता बोर्ड व विद्यापीठ स्तरावरील पदव्यांना समांतर मानल्या जाणार आहेत. केंद्र शासनाच्या या निर्णयाचा लाभ नोकरी करत शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्यांना तसेच नोकरीत पदोन्नतीसाठी होणार आहे .
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नुकतेच महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेला त्यांच्या सध्याच्या अभ्यासक्रमाचा विस्तार करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार दिल्लीतील हिंदी संस्थानच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेच्यावतीने आपल्या अभ्यासक्रमामध्ये काहीअंशी बदल करून अभ्यासक्रमातील प्रकरणे वाढविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. याचबरोबर सर्व परीक्षांच्या पेपरची संख्यादेखील वाढविली जात आहे. हे काम लवकरच पूर्ण होणार असून, येत्या १५ जानेवरीपासून महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेच्या परीक्षा या राज्यातील एसएससी व एचएससीचे बोर्ड आणि सर्व विद्यापीठस्तरावरील पदव्यांना समांतर असणार आहेत. म्हणजे राष्ट्रभाषा सभेची प्रबोध परीक्षा उत्तीर्ण होणारा विद्यार्थी कोणत्याही ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावीच्या वर्गामध्ये व राष्ट्रभाषा पंडित परीक्षा उत्तीर्ण होणारा विद्यार्थी एम.ए.साठी विद्यापीठस्तरावर प्रवेश घेऊ शकतो. त्याचबरोबर कोणतीही स्पर्धा परीक्षाही देऊ शकतो. केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांत काम करणारे कर्मचाऱ्यांनाही या परीक्षा देता येतील. केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेच्या परीक्षांना आता महत्त्व प्राप्त होणार आहे.