मुंबई विद्यापीठाला कव्वालीत विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 04:39 AM2018-10-26T04:39:51+5:302018-10-26T04:39:54+5:30
उर्दूतील शेरो-शायरी, सूर-तालाच्या साथीने रंगलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय आंतर-विद्यापीठ कव्वाली स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या संघाने विजेतेपद पटकावले, तर यजमान शिवाजी विद्यापीठाचा संघ सलग दुस-या वर्षी सहविजेता ठरला.
कोल्हापूर : उर्दूतील शेरो-शायरी, सूर-तालाच्या साथीने रंगलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय आंतर-विद्यापीठ कव्वाली स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या संघाने विजेतेपद पटकावले, तर यजमान शिवाजी विद्यापीठाचा संघ सलग दुस-या वर्षी सहविजेता ठरला. शिवाजी विद्यापीठात मंगळवारी ‘जश्न-ए-कव्वाली’ या स्पर्धेचा समारोप झाला.
शिवाजी विद्यापीठाच्या वि. स. खांडेकर भाषाभवन सभागृहात मंगळवारी सायंकाळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते विजेत्या संघांना चषक देऊन गौरविण्यात आले. रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप होते. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक रोहतकच्या (हरियाणा) महर्षी दयानंद विद्यापीठ, फगवाडाच्या (पंजाब) लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ, राजस्थानच्या बनस्थळी विद्यापीठाला विभागून देण्यात आला. तृतीय क्रमांक सागर (मध्य प्रदेश) येथील डॉ. हरिसिंह गौर विद्यापीठ, अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठ आणि नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला विभागून देण्यात आला.
दरम्यान, बक्षीस वितरण कार्यक्रमापूर्वी बनस्थळी विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठाच्या संघांनी कव्वालीचे विशेष सादरीकरण केले.