विद्यापीठ लोकाभिमुख व्हावे

By Admin | Published: April 25, 2015 12:30 AM2015-04-25T00:30:54+5:302015-04-25T00:46:49+5:30

सी. विद्यासागर राव : शिवाजी विद्यापीठाच्या नॅनोसायन्स स्कूल, ग्रंथालय विस्तार इमारतीचे उद्घाटन

The University should be made public | विद्यापीठ लोकाभिमुख व्हावे

विद्यापीठ लोकाभिमुख व्हावे

googlenewsNext

कोल्हापूर : विद्यापीठ, महाविद्यालये ही समाजापासून अलिप्त असू नयेत. ती समाजासाठी आहेत, समाजासाठी उभी आहेत आणि सार्वजनिक निधीमधून चालविली जातात. त्यामुळे विद्यापीठ, महाविद्यालयांनी सामाजिक बांधीलकी जपायलाच हवी. त्यांनी लोकाभिमुख व्हावे, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शुक्रवारी येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या नॅनोसायन्स व तंत्रज्ञान स्कूलची नूतन इमारत आणि बॅ. बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयाची दुमजली विस्तारित इमारत यांचे उद्घाटन राज्यपाल राव यांच्या हस्ते झाले. त्यानंतर विद्यापीठात विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिविभाग प्रमुख यांच्यासमवेत त्यांची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे, सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्यपालांचे सचिव विकासचंद्र रस्तोगी, जिल्हाधिकारी राजाराम माने, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा प्रमुख उपस्थित होते.
राज्यपाल राव म्हणाले, दक्षिण महाराष्ट्राची गरज ओळखून शिवाजी विद्यापीठाने सुरू केलेले शुगर टेक्नॉलॉजी, तसेच नॅनो टेक्नॉलॉजी सारखे काळाशी सुसंगत अभ्यासक्रम उपयुक्त ठरणारे आहेत. आंतर विद्याशाखीय अभ्यासक्रमांना मिळणारे वाढते प्राधान्य हा २१ व्या शतकातील स्वागतार्ह बदल आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने राबविलेली चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम अभ्यासक्रम पद्धती सुद्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरेल. श्री गणेशाला ज्याप्रमाणे १४ विद्या आणि ६४ कलांचे ज्ञान अवगत होते, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना सर्व विद्या, कलांचे ज्ञान, नवतंत्रज्ञान अवगत करून देण्यासाठी प्रयत्न व्हावेत.
ते म्हणाले, प्रशासन हा विद्यापीठाचा चेहरा असून, तो अधिक कार्यक्षम होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविषयक जागृती व आवड निर्माण होण्याच्यादृष्टीने विद्यापीठांनी विज्ञान महोत्सव आयोजित करावेत. शिवाय सामाजिक शास्त्रे, अभियांत्रिकी, कला आणि वाणिज्य शाखांमध्ये रुची वाढविण्यासाठी महोत्सव घ्यावेत. कला व वस्तुसंग्रहालये प्रस्थापित करण्यात आपण मागे आहोत. विद्यापीठांनी समाजापर्यंत संशोधन पोहोचविण्यासाठी विज्ञान संग्रहालये, पुरातन वस्तुसंग्रहालये, तसेच नैसर्गिक विज्ञान संग्रहालये स्थापन करावीत. विद्यापीठातील कृषिविषयक संशोधन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न व्हावेत.
बैठकीच्या प्रारंभी प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा अहवाल सादर केला.
यावेळी विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. आर. एम. कांबळे, कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे, बीसीयूडी संचालक डॉ. आर. बी. पाटील, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: The University should be made public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.