विद्यापीठातील विद्यार्थ्यांची हजेरी वायरलेस यंत्रावर
By Admin | Published: March 23, 2017 12:22 AM2017-03-23T00:22:38+5:302017-03-23T00:22:38+5:30
विद्यार्थ्यांनीच केले संशोधन : गैरहजर राहिल्यास पालकांच्या मोबाईलवर मेसेज
प्रदीप शिंदे -- कोल्हापूर --विद्यापीठ स्तरावर प्रत्येक लेक्चरला विद्यार्थ्यांची हजेरी घेतली जाते. यासाठी हजेरीपत्रक तयार करणे, त्यावर उपस्थित विद्यार्थ्यांच्या सह्या घेणे, ते पत्रक वर्षभर जपून ठेवणे या गोष्टी खूप किचकट व वेळखाऊ आहेत. या पद्धतीला आधुनिकतेची जोड देत शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी ‘वायरलेस हजेरी यंत्र’ बनविले आहे.
विद्यापीठातील संगणकशास्त्र विभागातील एम. एस्सी. द्वितीय वर्षात शिकणाऱ्या ओमकार सणगर, नितीन गुडाळे, अक्षय डोर्ले या विद्यार्थ्यांनी प्रा. कबीर खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे तीन महिन्यांमध्ये ‘वायरलेस अटेंडन्स सिस्टीम’ हे यंत्र तयार केले आहे. ते संगणकाशी जोडले गेले आहे. त्यावर प्रत्येक विद्यार्थ्याच्या बोटांचे ठसे घेऊन त्या विद्यार्थ्याचे नाव, हजेरी क्रमांक यांची संगणकावर नोंद केली जाणार आहे. हे यंत्र हलके व लहान असल्याने प्राध्यापक आपल्या लेक्चरला हे यंत्र वर्गात घेऊन जातील. वर्गातील विद्यार्थी या यंत्रावर बायोमेट्रिकप्रमाणे हजेरी लावतील. लेक्चर संपल्यानंतर प्राध्यापक हे यंत्र वर्गातून परत नेतील. एखादा विद्यार्थी गैरहजर असेल तर त्याच्या पालकांच्या मोबाईलवर ‘तुमचा पाल्य संबंधित तासाला गैरहजर आहे,’ हा मेसेजही पाठविण्याची सुविधा या यंत्रात आहे.
सध्या विद्यार्थ्यांची प्रत्येक लेक्चरची हजेरी कागदावर सही घेऊन घेतली जाते. काही विद्यार्थी लेक्चरला न बसता यावर सही करीत असल्याचे प्रकारही समोर आले आहेत.
विद्यार्थ्यांनी या हजेरी यंत्राची निर्मिती केली आहे. या प्रणालीमुळे हजेरीबाबत होणाऱ्या अनेक गैरप्रकारांना आळा बसणार आहे.
-प्रा. कबीर खराडे,
संगणकशास्त्र विभाग,
वायरलेस अटेंडन्स सिस्टीमचे फायदे संपूर्णपणे स्वयंचलित
वायरलेस यंत्र
अचूक हजेरी
गैरप्रकार टाळता येतो.
३०० फुटांपर्यंत या प्रणालीचा वापर करता येतो.
डेटाबेस बॅकअप
गैरहजेरीचा मेसेज पालकांना पाठविता येतो.
मोबाईल बॅटरीप्रमाणे हे यंत्र चार्ज करता येते.
कागदाची बचत