विद्यापीठात पानसरे अध्यासन स्थापणार
By admin | Published: March 24, 2015 10:23 PM2015-03-24T22:23:37+5:302015-03-25T00:45:30+5:30
शाहू कॉलेजमध्ये बैठक : विचार तळागाळांत पोहोचविण्यासाठी प्रस्ताव देण्याचा निर्णय
कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे हे समाजप्रबोधन चळवळीतील लढाऊ योद्धे होते. त्यासाठी त्यांनी प्राणाची बाजी लावली, त्यांचे विचार व कार्य तळागाळांतील व्यक्तींपर्यंत पोहोचावे आणि लढणारे कार्यकर्ते तयार व्हावेत यासाठी शिवाजी विद्यापीठात गोविंद पानसरे अध्यासन स्थापन करण्यासाठी प्रस्ताव देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सदर बाजारमधील राजर्षी शाहू कॉलेजमध्ये झालेल्या बैठकीत गोविंद पानसरे अध्यासन स्थापन समितीची स्थापना करण्यात आली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील होते. यावेळी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील, ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. जयसिंगराव पवार उपस्थित होते.यावेळी जे. एफ. पाटील यांनी अध्यासनाचा प्रस्ताव मांडला. पानसरेंचे विचार अध्यासनातून व्यक्त व्हावेत यासाठी त्यात अभ्यासपूर्ण संशोधन केले जावे, विद्यापीठाने ‘युजीसी’कडे अध्यासनाचा प्रस्ताव पाठवावा, शासनाने निधीची तरतूद करावी तसेच लोकवर्गणीतून ३ ते ४ कोटी रुपये जमा करावे लागणार आहेत तसेच दरवर्षी एकतरी आंतरराष्ट्रीय व्याख्यान आयोजित केले जावेत. सत्तर टक्क्यांच्यावर गुण मिळविलेल्या पण पानसरेंच्या विचारांनी चालणाऱ्या विद्यार्थ्यास त्यांच्या नावे पुरस्कार दिला जावा, असेही मत त्यांनी मांडले.
डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, पानसरे हे सामान्यांचे प्रबोधन करणारे नेते होते. त्यांनी राजकीय, धार्मिक, सामाजिक सगळ््या क्षेत्रांची तत्त्वाधिष्ठित मांडणी केली. त्यामुळे त्यांच्या नावे सुरू होणारे अध्यासन दर्जेदारच असावे याची दक्षता घेतली पाहिजे. वेळ लागला तरी चालेल, पण आपण सगळे मिळून हे अध्यासन अद्ययावत करूया.
यावेळी उदय नारकर, डॉ. अशोक चौसाळकर, विवेक घाटगे, शिवाजीराव परुळेकर, सतीशचंद्र कांबळे, ज. रा. दाभोळे यांनी मनोगत व्यक्त केले. राजेंद्र कुंभार यांनी आभार मानले.
लाखाचा निधी आणि वेतनही
एन. डी. पाटील म्हणाले, यापूर्वी विद्यापीठात स्थापन झालेल्या अध्यासनांबद्दलचा आणि शासकीय निधीबद्दलचा अनुभव वाईट आहे. बाळासाहेब देसाई अध्यासन, क्रांतिसिंह नाना पाटील स्मारक आणि आता शाहू स्मारक गेली कित्येक वर्षे रखडले आहे. त्यामुळे केवळ अध्यासनावर अवलंबून न राहता आपण आजपासूनच पानसरेंचे विचार मांडणारे कार्यक्रम आयोजित करू. त्यासाठी एक लाखाचा निधी मी देईन. गिरीष फोंडे यांनीही आपला महिन्याचा ३० हजार रुपये पगार या कार्यक्रमांसाठी जाहीर केला.