पूरग्रस्तांचे मनोधैर्य वाढविण्याचा विद्यापीठाचा ‘मानस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 12:37 AM2019-09-20T00:37:52+5:302019-09-20T00:37:56+5:30
प्रदीप शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : नैसर्गिक आपत्तीमध्ये आयुष्यभराची कमाई पाण्यात वाहून गेल्याने मानसिकदृष्ट्या खचलेल्या पूरग्रस्तांचे मनोधैर्य ...
प्रदीप शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : नैसर्गिक आपत्तीमध्ये आयुष्यभराची कमाई पाण्यात वाहून गेल्याने मानसिकदृष्ट्या खचलेल्या पूरग्रस्तांचे मनोधैर्य वाढविण्याचा ‘मानस’ शिवाजी विद्यापीठाच्या वतीने करण्यात आला आहे. मानसशास्त्र अधिविभागाच्या पुढाकाराने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील विविध कॉलेजमध्ये शिकणारे ‘मानसशास्त्र’चे एम.ए. भाग दोनचे विद्यार्थी पूरग्रस्तांचे समुपदेशन करणार आहेत.
विद्यापीठात मानसशास्त्र अधिविभागाच्या वतीने नुकतीच ‘पूरगस्तांचे समुपदेशन’ कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये कोल्हापुरातील महावीर, राजाराम महाविद्यालय, सांगलीतील कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, केबीपी कॉलेज (इस्लामपूर), एसजीएम कॉलेजचे (कºहाड) मानसशास्त्र विषयाचे विद्यार्थी सामील झाले होते. या विद्यार्थ्यांचा गट पूरबाधित गावांत जाऊन संवाद साधणार असून, पूरग्रस्तांंच्या मानसिकतेचे आकलन करणार आहेत. यानंतर हे विद्यार्थी संबंधितांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न करणार आहेत. यासाठी ‘आरईबीटी’ या थेरपीचा वापर करणार आहेत. हा उपक्रम दर शनिवारी व रविवारी राबविला जाणार आहे. यामध्ये १०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, मानसशास्त्र अधिविभागाच्या प्रमुख डॉ. भारती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिविभागातील प्रा. डॉ. अश्विनी पाटील, प्रा. अमोल कांबळेंसह डॉ. भरत नाईक (महावीर कॉलेज), डॉ. विकास मिणचेकर (केडब्लूसी), डॉ. घन:शाम कांबळे (एबीपी कॉलेज), प्रा. स्वाती मोरकर (एसजीएम), प्रा. विजय मुतनाळे (राजाराम कॉलेज) विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
‘आरईबीटी’ थेरपीच्या आधारे समुपदेशन
विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या ‘पूरग्रस्तांचे समुपदेशन’
कार्यशाळेत प्रशिक्षण घेतलेले ‘मानसशास्त्र’चे विद्यार्थी हे पूरबाधित गावात जाऊन शाळेतील मुले, तरुण-तरुणी, महिला, ज्येष्ठ नागरिक, आदींशी संवाद साधणार आहेत. त्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत. यावेळी त्यांच्यावरील ताण-तणावांचेही आकलन करून ‘आरईबीटी’ थेरपीच्या आधारे समुपदेश करणार आहेत.
पूरग्रस्तांमधील लक्षणे
भीती, निद्रानाश, झोप नीट न लागणे, छातीमध्ये धडधड वाढणे, उदासीनता ही लक्षणे प्रामुख्याने पूरग्रस्तांमध्ये दिसतात. मात्र, याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मानसिक खच्चीकरण होण्याची शक्यता असते.