विद्यापीठाच्या मंद संकेतस्थळाने अडचणी वाढल्या
By admin | Published: July 28, 2016 12:44 AM2016-07-28T00:44:46+5:302016-07-28T00:50:56+5:30
हजारो विद्यार्थी अडकले : पदवीच्या पहिल्या घासाला गोंधळाचा खडा
अविनाश कोळी -- सांगली -मंदगतीने चालणाऱ्या...कधी-कधी बंद पडणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या आॅनलाईन अर्जांच्या संकेतस्थळाने निर्माण केलेल्या गोंधळाने पदवीच्या पहिल्याच घासाला विद्यार्थ्यांना खडा लागला आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली येथील महाविद्यालयांमध्ये कागदोपत्री प्रवेश पूर्ण झालेल्या कला, वाणिज्य, विज्ञान, संगणक यासह अन्य विषयांच्या पदवीच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रवेश, पात्रता अर्ज भरण्याचे आदेश दिले आहेत, मात्र संकेतस्थळच मंदगतीने चालत असल्याने तिन्ही जिल्ह्यात हजारो विद्यार्थी प्रवेशापासून अद्याप वंचित राहिले आहेत.
यापूर्वी महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) मार्फत प्रवेश, पात्रता आणि परीक्षा अर्ज आॅनलाईन भरून दिले जायचे. यावर्षी शिवाजी विद्यापीठाने स्वत:च्या संकेतस्थळाद्वारे ही प्रक्रिया सुरू केली. वास्तविक प्रवेशाची महाविद्यालयीन स्तरावर प्रक्रिया पूर्ण झाली होती. विद्यार्थ्यांनी रितसर फी भरून प्रवेश घेतला होता. तरीही १५ जुलै रोजी उशिरा आॅनलाईन अर्जाबाबतचे आदेश विद्यापीठाने दिले. त्यानंतर तिन्ही जिल्ह्यांमध्ये यासंदर्भातील प्रशिक्षण कार्यशाळाही पार पडल्या. प्रत्यक्षात गोंधळ सुरू झाला तो संकेतस्थळाच्या मंदगती कारभाराने. तिन्ही जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांच्या संख्येचा विचार करून संकेतस्थळ तितके गतिमान करण्याची गरज होती. प्रत्यक्षात या संकेतस्थळाला गतीच नसल्याने प्रवेशाचे आॅनलाईन अर्ज रेंगाळले. तिन्ही जिल्ह्यांतील बहुतांश नेट कॅफेमध्ये हजारो अर्जांचे ढीग साचले. दिवसातून दोन अर्ज भरण्याइतकीही गती संकेतस्थळाला नाही. पात्रता अर्जांची अंतिम मुदत आता ३० जुलैपर्यंत वाढविली आहे. इतक्या कमी कालावधित हजारो विद्यार्थ्यांच्या आॅनलाईन प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण होणे कठीण आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसमोरील तसेच पर्यायाने महाविद्यालयांच्याही अडचणी वाढल्या आहेत. सांगलीतील प्रथम वर्ष पदवीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांनी या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला आहे.
मध्यरात्रीपर्यंत नेट कॅफेची सेवा
सांगलीच्या महाविद्यालयीन परिसरातील बहुतांश नेट कॅफेत हजारो अर्जांचे ढीग साचले आहेत. दिवसभर सुरू असणारे नेट कॅफे आता आॅनलाईन अर्जांच्या गर्दीमुळे मध्यरात्रीपर्यंत तसेच पहाटेपर्यंत सुरू आहेत.
विद्यार्थ्यांना भुर्दंड
आटापिटा करून प्रवेश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना आता आॅनलाईन गोंधळामुळे नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. संकेतस्थळाच्या अडचणींमुळे मिरजेतील काही नेटकॅफे चालकांकडून एक अर्ज भरण्यासाठी दीडशे ते दोनशे रुपये घेतले जात आहेत.
प्रथम वर्षातील या विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढल्या
बी. ए., बी. कॉम, बी. एस्सी, बी. सी. ए., बी. सी. एस, एल. एल. एम, एम. ए.