कबनूर उरूस समिती व ग्रामपंचायतीचा नियोजनशून्य कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:27 AM2021-04-09T04:27:09+5:302021-04-09T04:27:09+5:30
: दर्गा दर्शन न मिळाल्याने भाविक नाराज लोकमत न्यूज नेटवर्क कबनूर : येथील ग्रामपंचायत व उरूस समिती यांनी ...
: दर्गा दर्शन न मिळाल्याने भाविक नाराज
लोकमत न्यूज नेटवर्क
कबनूर : येथील ग्रामपंचायत व उरूस समिती यांनी उरुसापूर्वी नियोजन न केल्याने परगावाहून असंख्य भाविक प्रवास करीत आले. काही विक्रेतेही येऊन गेले. त्यामुळे त्यांचा चांगलाच गोंधळ उडाला. कोरोनासंदर्भात शासनाने जाहीर केलेल्या निर्बंधांमुळे दर्ग्यातील फक्त धार्मिक कार्यक्रम करून दर्गा दर्शनासाठी बंद ठेवला आहे. त्यामुळे भाविक नाराज झाले. कबनूरचा उरूस पंचक्रोशीसह महाराष्ट्र कर्नाटकामध्ये हिंदू- मुस्लीम ऐक्याचे प्रतीक व शाकाहारी उरूस म्हणून प्रसिद्ध आहे. त्यानिमित्ताने मुंबई, पुणे, कर्नाटकसह बाहेरील अनेक भक्त दर्शनासाठी येतात. ग्रामदैवत जंदीसाहेब व ब्रॉनसाहेब यांचा गुरुवारी व आज, शुक्रवारचा उरूस कोरोनामुळे दुसऱ्यांदा रद्द झाला. बुधवारी रात्री १२.०० वाजता गंधरात्रीचा कार्यक्रम मानकरी, मुजावर अशा दहा मोजक्या नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी गंधलेप व इतर धार्मिक विधी करण्यात आले. मात्र, दर्शनासाठी दर्गा बंद ठेवल्याने अनेक भाविकांना दर्शनाअभावी परत जावे लागले.
दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने चक्क दर्ग्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच पोलीस व्हॅन उभी केल्याने लांबूनही दर्शन घेणे अवघड बनले होते. त्यामुळे भाविकांमधून नाराजी पसरली. काही छोटे व्यापारी उरूस होईल, या आशेने आले होते; परंतु उरूस रद्द आहे हे समजताच तेही नाराज झाले. उरूस समितीने यापूर्वीच उरूस रद्द केल्याचे जाहीर केले असते, तर भाविक व व्यापाऱ्यांची हेळसांड झाली नसती. उरुसावेळी होणारी कोटीच्या घरातील आर्थिक उलाढाल ठप्प झाली. अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान झाले. ग्रामपंचायत व उरूस समितीने योग्य नियोजन न केल्याने अनेकांना त्याचा फटका बसला.
फोटो ओळी
०८०४२०२१-आयसीएच-११
कबनूर (ता. हातकणंगले) येथील दर्ग्यासमोर पोलीस प्रशासनाने पोलीस व्हॅन आडवी लावली.