जयप्रभा स्टडिओ परिसरात विनापरवाना बांधकाम
By admin | Published: September 21, 2014 12:51 AM2014-09-21T00:51:14+5:302014-09-21T00:51:14+5:30
महापालिकेची तक्रार : बिल्डर विकेश ओसवाल यांच्यावर गुन्हा
कोल्हापूर : मंगळवार पेठ, बेलबाग परिसरातील जयप्रभा स्टडिओच्या जागेतील इमारतीमध्ये विनापरवाना बांधकाम करून भोगवटा प्रमाणपत्र न घेता वापर सुरू केल्याने बिल्डर विकेश अभयकुमार ओसवाल (रा. बी वॉर्ड, मंगळवार पेठ) यांच्याविरोधात आज, शनिवारी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता प्रिया सुरेश पाटील (४०, रा. गुरुमहाराज नगरी, ध्यानचंद हॉकी स्टेडियमजवळ) यांनी फिर्याद दिली. या प्रकरणात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा कोणताही संबंध नसल्याचे पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले, जयप्रभा स्टडिओची एकूण जागा सुमारे नऊ एकर होती. त्यातील सहा एकर जागा मालक लता मंगेशकर यांनी सहा वर्षांपूर्वी वटमुखत्यारद्वारे विकेश ओसवाल यांना दिली. जागेचे सर्वाधिकार ओसवाल यांना असल्याने त्यांनी या जागेत इमारती बांधण्यास सुरुवात केली. त्यांनी बांधलेल्या इमारतीमध्ये पालिकेच्या नगररचना विभागाची कायदेशीर परवानगी न घेता विनापरवाना बांधकाम सुरू केले. तसेच वापरात बदल करून भोगवटा प्रमाणपत्र न घेता वापर सुरू केला. हा प्रकार पालिकेच्या निदर्शनास येताच कनिष्ठ अभियंता श्रीमती पाटील यांनी बिल्डर ओसवाल यांच्याविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ अनुसार गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)