कोल्हापुरातील खुनाचा तासगावात उलगडा

By admin | Published: July 31, 2016 12:11 AM2016-07-31T00:11:11+5:302016-07-31T00:11:11+5:30

पाचजण ताब्यात : तासगाव पोलिसांची कामगिरी

Unraveling the murder of Kolhapur killings | कोल्हापुरातील खुनाचा तासगावात उलगडा

कोल्हापुरातील खुनाचा तासगावात उलगडा

Next

तासगाव : करवीर पोलिस ठाण्यात बेपत्ता म्हणून, तर निपाणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील पाचगाव (ता. करवीर) येथील शामराव पांडुरंग फडतरे यांच्या खुनाचा छडा लावण्याची कामगिरी तासगाव पोलिसांनी केली. खुनाचे कोणतेही धागेदारे नसताना, पोलिसांनी खुनाची पोलखोल करून पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती तासगावचे पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंंगळे यांनी पत्रकार बैठकीत दिली.
या प्रकरणात रणजित मारुती पाटील (वय २६, रा. गुडाळ, ता. राधानगरी), अमोल संजय कुंभार (२०, रा. तासगाव), विनायक सुधीर गुरव (२०, रा. तासगाव), स्वप्निल संजय तोरसकर (२१, रा. एर्नाळ, निपाणी, जि. बेळगाव) आणि नावीन्य दशरथ महाजन (२१, रा. शिवाजीनगर, निपाणी) या पाचजणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या पाचजणांसह मृताची पत्नी सुमन फडतरे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंंदे, अप्पर पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या मार्गदर्शनानुसार पोलिस उपअधीक्षक कृष्णांत पिंंगळे यांनी तासगाव तालुक्यात शहरातील सराईत आणि संशयित लोकांवर पाळत ठेवण्यासाठी मोहीम राबविली होती. पोलिस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी, पोलिस नाईक शैलेंद्र कोरवी, दरिबा बंडगर, योगेश यादव यांचे पथक पेट्रोलिंंग करीत असताना, २८ जुलै रोजी तासगाव ते भिलवडी नाका परिसरात येथील संजय कुंभार हा मोटारसायकलवरून (एमएच १०, ३०७०) संशयितरीत्या फिरत असल्याचे आढळून आले. त्याच्याकडे कागदपत्रांची मागणी केली असता, कागदपत्रे नसल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. या चौकशीत खुनाचा उलगडा झाला.
पाचगाव (ता. करवीर) येथील मृत शामराव पांडुरंग फडतरे दारूच्या नशेत पत्नी सुमन फडतरे हिचा छळ करीत असे. या छळाला कंटाळल्याने तिच्या बहिणीचा मुलगा रणजित पाटील याने त्याचा खून करण्याचे ठरविले. त्यानुसार रणजित पाटील याने चार मित्रांना गुडाळ (ता. राधानगरी) या गावी बोलावून घेत खुनाचा कट केला. त्यानंतर शामराव फडतरे यांना दसऱ्याच्या सणासाठी १८ जुलैला गुडाळ येथे बोलावून घेतले. तेथे पाचजणांनी त्यांना गंभीर मारहाण केली. जखमी झाल्यानंतर रणजित पाटील याने नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून केला.
त्यानंतर मृतदेह यमगर्नी गावानजीक नदीजवळ फेकून दिला. निपाणी ग्रामीण पोलिसांना हा मृतदेह आढळून आला. त्याची आकस्मिक मृत्यूची नोंद केली. दरम्यान, मुख्य संशयित मृत फडतरे यांची पत्नी सुमन हिने पती बेपत्ता असल्याची फिर्याद करवीर पोलिसांत दिली. मात्र, तासगाव पोलिसांच्या कामगिरीमुळे खुनाचा छडा लागला. मृताच्या पत्नीसह सहाजणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तासगाव पोलिसांनी पाचजणांना ताब्यात घेतले असून, गुन्ह्याचा तपास आणि संशयित आरोपींना राधानगरी पोलिस ठाण्याकडे वर्ग केले आहे.
विशेष पोलिस महानिरीक्षकांकडून कौतुक
संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर तासगाव पोलिसांना खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा झाला. त्यानंतर विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी कोल्हापूर आणि निपाणीपर्यंतच्या तपासाबाबत मार्गदर्शन केले. गुन्ह्याच्या पूर्ण तपासानंतर नांगरे-पाटील यांनी पोलिस उपाधीक्षक पिंगळे आणि त्यांच्या टीमचे विशेष कौतुक केले.
तर खून पचला असता
शामराव फडतरे यांचा १८ जुलैला खून करण्यात झाला. त्यानंतर कटात सहभागी असलेल्या त्यांच्या पत्नीने खून पचविण्याच्या उद्देशाने करवीर पोलिस ठाण्यात २५ जुलैला पती बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती, तर निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांना २६ जुलैला सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. त्यानंतर निपाणी पोलिसांत बेपत्ता फिर्यादीनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद होती. तासगाव पोलिसांनी छडा लावला नसता, तर खून पचला असता. त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीचे प्रशासनाकडून कौतुक होत आहे.
खुनाच्या कटात डान्स ग्रुप
खुनाच्या कटात सहभागी असणाऱ्या पाचजणांमधील गुडाळ येथील रणजित पाटील हा मृताच्या मेहुणीचा मुलगा आहे. त्याचा नटराज डान्स ग्रुप आहे. या ग्रुपच्या माध्यमातूनच त्याची तासगावातील दोघांशी, तर निपाणी परिसरातील दोघांशी मैत्री जमली होती. हे सर्व डान्स ग्रुपच्या माध्यमातून एकत्रित येत होते. या चौघांना पैशांचे आमिष दाखवून खुनाच्या कटात सहभागी करून घेतले.
सुतावरून स्वर्ग
- मृत करवीर तालुक्यातील, खून राधानगरी तालुक्याच्या हद्दीत, तर आकस्मिक मृत्यूची नोंंद निपाणी ग्रामीण पोलिसांत असलेल्या या प्रकरणात तासगाव पोलिसांनी सुतावरून स्वर्ग गाठत खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावला.
- कटात सहभागी असलेल्या तासगाव येथील एकाने खून झालेल्या फडतरे यांची दुचाकी आणली होती. या गाडीला सांगली जिल्ह्यातील बनावट नंबरप्लेट लावली होती. त्याच्या संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी दोन दिवसांत खुनाचा छडा लावून संशयित पाचही आरोपींना ताब्यात घेतले.

Web Title: Unraveling the murder of Kolhapur killings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.