‘दौलत’बाबत अस्वस्थता
By admin | Published: April 16, 2015 10:23 PM2015-04-16T22:23:38+5:302015-04-17T00:16:46+5:30
भवितव्य अधांतरी : स्थानिक नेते गुंतलेत गोकुळ, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत
नंदकुमार ढेरे - चंदगड - २० एप्रिलचा दिवस जसजसा जवळ येत चालला आहे. तसतसे चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या काळजांचे ठोके वाढत चालले आहेत. थेटे पेपर्स प्रा.लि.,चा अडथळा दूर झाल्याने दौलत साखर कारखाना चालविण्यास देण्याबाबतची निविदा जिल्हा मध्यवर्ती बँकेने प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार १७ एप्रिल ही कोरी निविदा फॉर्म स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे, तर टेंडर फ ॉर्म सादर करण्याची अंतिम तारीख २० एप्रिल आहे.
या तारखेपर्यंत कोणतीच सक्षम कंपनी किंवा संस्था पुढे न आल्यास काय घडेल? बँक आपला परवाना वाचविण्यासाठी थेट दौलतचा लिलाव पुकारेल. राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे तर दौलतच्या विक्रीचीच भाषा करीत आहेत. कोणीच पुढे आले नाही, तर तालुक्यातील शेतकरी, कामगार, वाहतूक, कंत्राटदार, आदींनी एकत्र येऊन विविध मार्गांनी पैसे जमा करायचे आणि सहकारातच दौलत चालवायचा, अशी महत्त्वाकांक्षी योजना दौलत वाचविण्यासाठी धडपडणाऱ्या भल्या माणसांनी जाहीर केली आहे. परंतु, ती प्रत्यक्षात येईल की स्वप्नरंजन ठरेल, हे सांगता येत नाही. मोठ्या प्रमाणावर पैसे जमा करण्यासाठी वेळही खूप लागेल; पण बँका आता फार काळ थांबणार नाहीत असेच चित्र आहे. त्यामुळे कोणीच टेंडर भरले नाही म्हणून लिलाव अटळ असल्याचे दाखवून बँक ‘दौलत’ची विक्री करेल. त्यातून दौलतवरील कर्जाच्या मुद्दल रकमांची फेड होऊ शकेल. बँक ते सहनही करील. पण, शेतकरी, कामगार पगार आणि व्यापारी देण्यांचे काय? सध्या गोकुळ व जिल्हा बँकेच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे. सर्वच बडे नेते त्यामध्ये अडकून पडले आहेत. त्यांना सत्ता कशी मिळवता येईल, याची काळजी लागून राहिली आहे. दुसरा कोणताच विचार करायला त्यांना वेळ नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे दौलतबाबत ते अवाक्षरही बोलण्यास तयार नाहीत.
मालमत्ता जप्त कराव्यात
दौलतवर जो कर्ज व देणी यांचा प्रचंड मोठा
बोजा निर्माण झाला. शेकडो कोटी रुपयांचा तोटा झाला. त्याबाबतचे लेखापरीक्षण होऊन जबाबदाऱ्या निश्चित कराव्यात, जबाबदार व्यक्तींच्या
मालमत्ता जप्त कराव्यात. त्यातून प्रथम कर्जे व
देणी फेडावित, असे लोक आता उघडपणे बोलू
लागले आहेत.
जोपर्यंत लेखापरीक्षण होत नाही, जबाबदाऱ्या निश्चित होत नाहीत आणि संबंधितांकडून वसुली होत नाही. तोपर्यंत दौलतचा लिलाव होऊ नये, अशी जनतेची मागणी आहे.
त्यातल्या त्यात आशादाई बाब म्हणून माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दौलत भाडेतत्त्वावर चालवण्याची तयारी दर्शविली आहे. तर दौलत कारखाना सहकारातच राहावा, त्याचा लिलाव होऊ नये, अशी भावना तालुक्यात आता जोर धरू लागली आहे.