सातव्या वेतनासंदर्भातील अधिसूचनेमुळे विद्यापीठ सेवकांमध्ये अस्वस्थता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:12 AM2020-12-28T04:12:54+5:302020-12-28T04:12:54+5:30
कोल्हापूर : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सातवा वेतन आयोग विद्यापीठ कर्मचाऱ्यांना लागू करण्यासंदर्भात दिलेला शब्द पाळला; ...
कोल्हापूर : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सातवा वेतन आयोग विद्यापीठ कर्मचाऱ्यांना लागू करण्यासंदर्भात दिलेला शब्द पाळला; पण याच विभागातील अधिकाऱ्यांनी चुकीचे निर्णय घेऊन अन्यायकारक अधिसूचना काढल्याने विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे, असे मत महाराष्ट्र विद्यापीठ महासंघाचे अध्यक्ष रमेश शिंदे यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठात शनिवारी विद्यापीठ सेवक संघ समितीच्या राज्यस्तरीय बैठकीत ते बोलत होते.
शिंदे म्हणाले, आश्वासित प्रगती योजनेचा शासन आदेश रद्द करून पाचव्या व सहाव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने लागू करण्यात आलेला सातवा वेतन आयोग हा अन्यायकारक आहे. वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीही कमी करून पाचव्या वेतन आयोगातील असुधारित वेतनश्रेणी आधारभूत मानून त्या कमी केल्या आहेत. त्यामुळे सातव्या वेतनाची वेतननिश्चिती केल्याने प्रत्यक्ष वेतन तर कमी होणारच आहे; परंतु वसुलीचेही आदेश निर्गमित केले आहेत. ही बाब कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक व निषेधार्ह आहे.
शिवाजी विद्यापीठ सेवक संघाचे अध्यक्ष बाबा सावंत म्हणाले, शासनाने सातव्या वेतन आयोगासंदर्भातील अधिसूचना काढून विद्यापीठ सेवकांची फसवणूक केली आहे. बैठकीस उपस्थित असलेल्या मुंबई, पुणे, जळगाव, अमरावती, सोलापूर, औरंगाबाद, नांदेड, गोंडवाना, नागपूर विद्यापीठांतील पदाधिकारी उपस्थित होते. महासंघाचे कार्याध्यक्ष अजय देशमुख, महासंघाचे महासचिव मिलिंद भोसले, महाविद्यालयीन कर्मचारी महासंघाचे अनिल घाडगे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी महासंघाचे उपाध्यक्ष डॉ. कैलास पात्रीकर, यशवंत ब्रह्मे, केतन कान्हेरे, सचिव शिवराम लुटे, सल्लागार प्रा. डॉ. राहुल खराबे, समन्वयक आनंदराव चव्हाण, अनिल खामगावकर, सुरेश लाड, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट
आज संयुक्त बैठक
आज, रविवारी महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक यांच्यामध्ये संयुक्त बैठक होणार आहे. त्यानंतर याबाबत पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे.
फोटो : २६१२२०२०-कोल-सेवक संघ
आेळी : कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठामध्ये शिवाजी विद्यापीठ सेवक संघातर्फे आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य विद्यापीठ महासंघाच्या राज्यस्तरीय बैठकीत महासंघाचे अध्यक्ष रमेश शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बाबा सावंत, अजय देशमुख, डाॅ. कैलास पात्रीकर, शिवराम लुटे, डाॅ. राहुल खराबे, मिलिंद भोसले, आदी पदाधिकारी उपस्थित होते.