असुरक्षित इचलकरंजी-- दृष्टीक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 12:05 AM2018-09-25T00:05:05+5:302018-09-25T00:05:39+5:30

इचलकरंजी महाराष्टचे मॅँचेस्टर, वस्त्रोद्योग नगरी, मुंबईप्रमाणे कुणालाही सामावून घेणारी, ‘रोजगार देणारी नगरी’ म्हणून या शहराची ओळख. मात्र, आज ही ओळख हरवून जाते की काय? अशी भीती तमाम इचलकरंजीकरांना लागली आहे की नाही माहीत नाही. मात्र, तेथील काही यंत्रमागधारकांशी चर्चा केल्यानंतर मात्र तसे जाणवते हे निश्चित.

Unsafe Ichalkaranji - Look at | असुरक्षित इचलकरंजी-- दृष्टीक्षेप

असुरक्षित इचलकरंजी-- दृष्टीक्षेप

googlenewsNext

-चंद्रकांत कित्तुरे

इचलकरंजी महाराष्टचे मॅँचेस्टर, वस्त्रोद्योग नगरी, मुंबईप्रमाणे कुणालाही सामावून घेणारी, ‘रोजगार देणारी नगरी’ म्हणून या शहराची ओळख. मात्र, आज ही ओळख हरवून जाते की काय? अशी भीती तमाम इचलकरंजीकरांना लागली आहे की नाही माहीत नाही. मात्र, तेथील काही यंत्रमागधारकांशी चर्चा केल्यानंतर मात्र तसे जाणवते हे निश्चित. शंभराहून अधिक वर्षांचा इतिहास इचलकरंजीच्या वस्त्रोद्योगाला आहे. एका यंत्रमागापासून आज सुमारे दीड लाख साधे यंत्रमाग, सुमारे २० हजार आॅटो आणि सेमी आॅटोलूम, या यंत्रमागांशी संबंधित सायझिंग, सूतगिरण्या, रेडिमेड कपड्यांच्या कारखान्यांसह वस्त्रोद्योगाला लागणाऱ्या सर्वच उत्पादनांचे ते केंद्र बनले आहे.

यंत्रमाग व्यवसाय हा विकेंद्रित व्यवसाय आहे. यामुळे येथे कुणीही यावे व काम करून पोट भरावे, स्वत:चा विकास साधावा, अशी येथील परिस्थिती. मी लहान असताना बाहेरील राज्यातून आलेले साधे यंत्रमाग कामगार, हमाल आज कारखानदार किंवा व्यावसायिक बनले आहेत. मूळचे इचलकरंजीकर मात्र आहे तेथेच दिसत आहेत. कारण ते छोटे यंत्रमागधारक आहेत. स्वत:च कुटुंब चालतयं त्यात समाधानाने जगता येतंय, कशाला जादा व्याप, अशी अनेकांची भूमिका. तेजी-मंदीच्या चक्रात अडकणाऱ्या वस्त्रोद्योगात धोका पत्करण्याची तयारी नसायची, त्यामुळे ते आहेत तिथेच आहेत. ज्यांनी धोका पत्करला, दूरदृष्टीने व्यवसायात आधुनिकता आणली, व्यवसाय बदलला, त्यांनी मात्र प्रगती केल्याचे स्पष्टपणे दिसते आहे.

हे सगळे आता सांगायचे कारण म्हणजे, गेल्या आठवड्यात इचलकरंजीला जाण्याचा योग आला. तेथील एक दूरदृष्टीने व्यवसायात प्रगती करणारे कारखानदार असलेल्या नातेवाइकांकडे गेलो होतो. शुक्रवारचा दिवस होता म्हणजे तमाम इचलकरंजीकरांचा वाढदिवस. कारण हा दिवस पगाराचा. आठवडा बाजाराचा. बहुतेकांच्या घरी रात्रीचा सामिष आहार ठरलेला. दुपारी चारच्या सुमारास बसवेश्वरनगर वैरण बाजार परिसरातून दोन परप्रांतीय कामगार बाजाराच्या दिशेने चाललेले. एवढ्यात समोरून मोटारसायकलवरून दोघेजण आले. त्यांनी या दोघांना अडविले. ‘दोन-दोनशे रुपये द्या, अन्यथा तुम्हाला सोडणार नाही,’ असे म्हणत त्यांना दम देऊ लागले. चार खून केले आहेत. माझे काही वाकडे झाले नाही, असेही त्यातील एकजण दम देताना म्हणत होता. परप्रांतीय असल्याने हे दोघेही घाबरले. काय करावे, ते त्यांना सुचत नव्हते.

एवढ्यात योगायोगाने समोरून त्यांचे मालक म्हणजेच नातेवाईक कारखानदार मोटारसायकलवरून पत्नीसह येत होते. त्यांना पाहताच यांच्या जिवात जीव आला. त्यांना थांबवून ‘अण्णा, दोनशे रुपये द्या,’ असे म्हणू लागले. ‘सकाळी तर पगार दिलाय पुन्हा कशाला पैसे मागताहेत असे वाटून ‘कशाला रे,’ असे मालकाने विचारताच त्या दोघांकडे बोट दाखून ते आपल्याला दम देऊन पैसे मागत आहेत त्यांना द्यायला पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. हे ऐकून मालक मोटारसायकलवरून खाली उतरले आणि त्या दोघांना कसले पैसे पाहिजेत, असे विचारू लागले. मालक अंगापिंडाने मजबूत असल्याने आणि आवाजात जरब असल्याने लगेच त्यातील एकाने दारूला पैसे पाहिजेत म्हणून मागत होतो, असे सांगितले. हे ऐकून मालकाने एकाच्या दोन कानशिलात लगावताच तो नरमला. दरम्यान, आपल्या भागातील कारखानदार थांबल्याचे पाहून त्या रस्त्यावरून जाणारे अन्य काही कारखानदारही थांबले. कामगाराला धमकी देऊन पैसे उकळत असल्याचे समजताच त्यांनीही आपले हात धुऊन घेतले. एकाला मारहाण होताना पाहून दुसरा पळून गेला. याची यथेच्छ धुलाई होताच तो हाता-पाया पडू लागला. त्यामुळे त्यालाही सोडून देण्यात आले. पोलिसांचे झंझट पाठीमागे नको म्हणून पोलिसांच्या ताब्यात देण्याचे त्यांनी टाळले. खरेतर त्याला पोलिसांत द्यायलाच हवे होते; पण पोलिसांबद्दलचे गैरसमजही असे करायला भाग पाडतात. हे सविस्तर सांगण्याचे कारण इतकेच की, इचलकरंजी किती असुरक्षित बनली आहे ते कळावे.

गेल्याच आठवड्यात एका व्यावसायिकाला असेच दोघांनी लुटले. पोलिसांनी याचा छडा लावला; पण पोलिसांपर्यंत न जाणारे असे किती गुन्हे असतील? सध्या इचलकरंजी तीव्र मंदीच्या वाटेवरून चालत आहे. बहुतेक यंत्रमाग आठवड्यात केवळ तीनच दिवस चालू आहेत. कामगार आणि छोटे यंत्रमागधारक यांचे कसेतरी कुटुंब चालावे, अशीच तेथील स्थिती आहे. नोटाबंदी आणि जीएसटीमुळेच ही परिस्थिती ओढावल्याचे अनेकांचे मत आहे. अधून-मधून एखादा व्यापारी कोट्यवधीचे दिवाळे काढून जातो. यामुळेही यंत्रमागधारकही असुरक्षित आहेत. पुरेसे काम आणि पगार मिळत नसल्याने गुंडगिरी वाढू लागली आहे. यामुळे कामगारांसह सर्वसामान्य नागरिकही स्वत:ला असुरक्षित समजू लागले आहेत. ही असुरक्षितता घालविण्याचे काम शासन, पोलीस आणि लोकप्रतिनिधी करतील, तरच इचलकरंजीची खरी ओळख टिकून राहील.

(लेखक ‘लोकमत’चे उप वृत्तसंपादक आहेत.)
kollokmatpratisad@gmail.com

Web Title: Unsafe Ichalkaranji - Look at

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.