सभासदत्व रद्द बेकायदेशीर, शेतकरी संघाच्या जुन्या सदस्यांची तक्रार
By admin | Published: June 13, 2017 04:25 PM2017-06-13T16:25:50+5:302017-06-13T16:25:50+5:30
निर्णय रद्द करण्याची जिल्हा उपनिबंधकांकडे मागणी
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. १३ : राजकारण डोळ्यासमोर ठेवून संघाच्या जुन्या सभासदांचे सभासदत्व बेकायदेशीर रित्या रद्द केले आहे. सभासदत्व रद्द करत असताना कोणत्याही प्रकारचे नोटीस आम्हाला पाठविलेले नाही, म्हणणे न घेताच थेट कारवाई केली आहे. हे बेकायदेशीर असून सभासदत्व रद्द करण्याचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी सोळा सभासदांनी जिल्हा उपनिबंधक अरूण काकडे यांच्याकडे मंगळवारी केली.
शेतकरी संघाच्या विद्यमान संचालक मंडळाने राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून सभासद रद्द केले आहेत. लाभांशाबाबत संघ व्यवस्थापनाशी विचारणा करण्यास गेलो असता, आपले सभासदत्व रद्द केल्याचे सांगण्यात आले.
संचालक मंडळाने भागभाडवंलासह सभासदत्वा बाबत एखादा निर्णय घेण्या अगोदर संबधितांना नोटीसीव्दारे कळविणे अपेक्षित होते. त्याचबरोबर कायद्यातील तरतुदीनुसार सहकार खात्याचीही संमती घेण्यात आली नसल्याचे समजते. त्यामुळे संचालक मंडळाने केलेली कारवाई ही बेकायदेशीर असून सदरचा निर्णय रद्द करावा व कमी केलेल्या सभासदांना त्यांचा हक्क द्यावा, अशी मागणी सभासदांनी जिल्हा उपनिबंधक अरूण काकडे यांच्याकडे केली.
यावेळी महादेव देसाई, तानाजी देसाई, बाळासो देसाई, शिवाजी देसाई, संभाजी देसाई, मारूती चव्हाण, रत्नाबाई चव्हाण, संभाजी चौगले, संभाजी जरग, अमृत देसाई, प्रकाश देसाई, निवृत्ती शिंदे, अनिल शिंदे, सुनिलराजे पाटील, सचिन मोहिते, सदाशिव चौगले, मधूकर पाटील आदी सभासद उपस्थित होते.