अशांतता हेच आजच्या अंधारयुगाचे लक्षण : अतुल पेठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 01:02 AM2019-02-21T01:02:22+5:302019-02-21T01:03:40+5:30

समाजाला आज वैचारिक आंधळेपणा आणि बहिरेपणा आला आहे. धर्म, जात, देशाच्या नावाने नव्या पिढीला हिप्नोटाईज केले जात आहे. हिंसेची चटक लागल्यासारखा समाज बेभान झाला

 Untouchability is the character of today's dark age: Atul Pethe | अशांतता हेच आजच्या अंधारयुगाचे लक्षण : अतुल पेठे

कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात कॉ. गोविंद पानसरे संघर्ष समिती, श्रमिक प्रतिष्ठान व पुरोगामी संघटनांच्या वतीने बुधवारी आयोजित कार्यक्रमात अतुल पेठे यांनी विचार मांडले. यावेळी बाबूराव कदम, एस. बी. पाटील, दिलीप पोवार, मुक्ता दाभोलकर, डॉ. आ. ह. साळुंखे, मेघा पानसरे, उमेश सूर्यवंशी उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देगोविंद पानसरे स्मृतिदिनी ‘२१ वे शतक; एक अंधारयुग’ या विषयावर व्याख्यान

कोल्हापूर : समाजाला आज वैचारिक आंधळेपणा आणि बहिरेपणा आला आहे. धर्म, जात, देशाच्या नावाने नव्या पिढीला हिप्नोटाईज केले जात आहे. हिंसेची चटक लागल्यासारखा समाज बेभान झाला असून ही सामाजिक अशांतताच आजच्या अंधारयुगाचे लक्षण आहे; पण देशाच्या पुरोगामी इतिहासाने अशी अनेक अंधारयुगे बदलली आहेत. म्हणून आपण गोविंद पानसरे यांच्या वैचारिक प्रवाहासोबत जगूया, हे युगही सरेल, असा आशावाद प्रसिद्ध नाटककार अतुल पेठे यांनी बुधवारी व्यक्त केला.

शाहू स्मारक भवनात कॉम्रेड गोविंद पानसरे संघर्ष समिती,श्रमिक प्रतिष्ठान व पुरोगामी संघटनांच्या वतीने गोविंद पानसरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते ‘२१ वे शतक : एक अंधारयुग’ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे होते. व्यासपीठावर मुक्ता दाभोलकर, मेघा पानसरे, उमेश सूर्यवंशी, दिलीप पोवार, बाबूराव कदम, एस. बी. पाटील उपस्थित होते.
पेठे म्हणाले, युती म्हणजे एकमेकांच्या हातात हात घालून केलेली मांडवली. अनिर्बंध सत्तेच्या लालसेपोटी ठेचा, घुसा, उडवा आणि नामशेष करण्याचे राजकारण सुरू आहे.

बहिरेपणा आला की बधिरता, एकटेपणा, निराशा, अविचार, अविवेक आणि शेवटी अतिरेक होतो. सेल्फी, लाईक, डिस्लाईक या पलीकडे जाऊन मानसिक, वैचारिक, बौद्धिक उन्नती कुणाला नको आहे. विचार, संवाद आणि दृष्टिकोनाला लागलेल्या या ओहोटीच्या युगात दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश अशा विचारवंतांचे खून पाडले जात आहेत; पण त्यांच्या विचारांच्या प्रवाहाचा स्पर्श झालेला प्रत्येकजण वैभवशाली इतिहास खांद्यावर घेऊन मिरवत आहे.

आ. ह. साळुंखे म्हणाले, पुलवामा घटनेनंतर आपण काश्मीर म्हणजे भारत आहे की पाकिस्तान याचं भान विसरतोय. काश्मीरशी व्यवहार तोडण्यापासून ते शिक्षणासाठी विखुरलेल्या विद्यार्थ्यांना धमकावण्यापर्यंतचे प्रकार होत आहेत. प्रत्येक काश्मिरी माणूस म्हणजे अतिरेकी असा विचार न करता नकार आणि द्वेषाचा अंधार सारण्यासाठी प्रकाशाच्या ज्योती घेऊन अनेक माणसे उभी आहेत. उंबऱ्याबाहेर आलेला अंधार घरात येणार नाही, यासाठी आपण निर्धाराने लढू या. मेघा पानसरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मुक्ता दाभोलकर, दिलीप पोवार यांनी मनोगत व्यक्त केले. उमेश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.सांस्कृतिक कार्यक्रमात आदित्य खेबुडकर, रसिया पडळकर, समीर पंडितराव, रोहित पोतनीस, अक्षय पोकळे, कृष्णा भूतकर, रणजित कांबळे, सुहास लकडे, मल्हार महेकर यांनी नाटकाद्वारे स्थितीवर भाष्य
केले.


विचारधारा संपणार नाही
काही कारणांमुळे गीतकार जावेद अख्तर या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. मात्र त्यांनी व्हिडिओ क्लिपद्वारे ‘गोविंद पानसरे हे केवळ शरीर नव्हते; तर ते एक विचारधारा होते. त्यांना गोळी घालून ही विचारधारा संपणार नाही,’ असे विचार मांडले.

 

Web Title:  Untouchability is the character of today's dark age: Atul Pethe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.